नार्वेकरांनी सरकारला भरला सज्जड दम
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): मुरगाव पोर्ट ट्रस्टतर्फे लाखो चौरसमीटर जागा खाजगी कंपन्यांना ‘मरीना’ उभारण्यासाठी देण्याचा प्रकार, ‘एमपीटी’कडूनच बेकायदा खनिज निर्यातीला मिळणारे कथित प्रोत्साहन, मांडवीतील कॅसिनो व अन्य जहाजांमुळे होणारे जलप्रदूषण तथा पर्यावरणाचा र्हास आदींबाबत सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ कारवाई करावी, असा सज्जड दम माजी अर्थमंत्री तथा हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी भरला आहे.
ऍड. नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून ‘एमपीटी’कडून वर्षाकाठी ३०० कोटी रुपयांच्या खनिजाची बेकायदा निर्यात होत असल्याचे उघड झाले आहे. माजी अध्यक्ष प्रवीण आगरवाल यांच्या कार्यकाळात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे खनिज अनधिकृत पद्धतीने निर्यात झाल्याचा ठपका ऍड. नार्वेकर यांनी ठेवला. या व्यक्तीवर ‘एफआयआर’ नोंद करण्याच्या मागणीबाबतही सरकार काहीच करीत नाही, अशी खंतही सदर पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
मांडवी नदीत कॅसिनो जहाजे कशा प्रकारे बेकायदा वावरत आहेत, याची माहिती देऊनही सरकारकडून त्यांची पाठराखण केली जात आहे.आपण अलीकडेच पणजी ते हळदोणा अशी जलसफर केली व ही धक्कादायक स्थिति आपल्याला पाहायला मिळाली, असेही ऍड.नार्वेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
कॅसिनो व मांडवीतील इतर बोटींतून टाकण्यात येणार्या कचर्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी सुरू आहे. समुद्राकाठी प्लास्टिक तथा इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. या गोष्टीकडे त्वरित गंभीरपणे पाहीले नाही तर मांडवी नदीवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. याकामी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निरीक्षण करावे, असे आवाहन ऍड.नार्वेकर यांनी केले आहे.
Sunday, 5 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment