साबांखात्याला ग्रामस्थांचे निवेदन प्रसंगी आंदोलनाचा इशारा
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): दुधसागर नदीच्या काठावर वसलेल्या संपूर्ण कुळे गावात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे प्रदूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने या भागासाठी त्वरित स्वतंत्र पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी कुळे नागरिक समितीने केली आहे. पाचशे सह्यांचे एक निवेदन आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना आल्तिनो येथे सादर करण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. जेथे पाणी प्रदूषित होते त्याच ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी पंप का बसवण्यात आला आहे, या मागील कारण स्पष्ट होत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
निसर्गाची देणगी लाभलेले कुळे गाव नेहमीच देशी पर्यटकांचे आवडते स्थान ठरले आहे. दर शनिवार, रविवारी दुधसागर धबधबा, देवचारा कोंड तसेच सिग्नला कोंड येथे पर्यटकांची आंघोळीसाठी गर्दी असते. ज्या ठिकाणी पर्यटक आंघोळ करतात तेथेच गावातील लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाणी सिंचन पंप बसवलेला आहे. सिग्नला कोंड येथ हा पंप बसवला असून याच ठिकाणी रोज शेकडो लोक आंघोळ करतात. दुपारच्या जेवणानंतर उरलेले जेवण, प्लॅस्टिकच्या पिशव्या, नॅपकिन्स तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्याही तेथेच टाकल्या जातात. याकडे स्थानिक पंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून स्वच्छता राखण्यासाठी कोणताही यंत्रणा पंचायत किंवा पाणीपुरवठा खात्याकडे नाही. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील प्रदूषित पाणी स्थानिक लोकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा दावा नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसूरकर यांनी केला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे गावात पाण्यातून रोगराई पसरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित खात्याने आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास कुळे गावातील ग्रामस्थ आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्यास कचरणार नाहीत, असा इशारा श्री. मसूरकर यांनी दिला आहे. आज सकाळी गावातील ग्रामस्थ व समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयीचे निवेदन सादर केले.
Saturday, 8 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment