आज अंत्यसंस्कार, राज्यभरात हळहळ
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- गोव्यातील आघाडीचे समाजिक कार्यकर्ते व कोकणी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुश्रुत मार्टिन्स यांचे काल रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जुझे मार्टिन्स यांचे ते सुपुत्र होते. कोकणी भाषा, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदान व खास करून विद्यार्थी चळवळीतील त्यांचे काम उल्लेखनीय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
काल रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांना तात्काळ पणजीतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले; तथापि, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. बीना मार्टिन्स व दोघी कन्या असा परिवार आहे. उद्या (रविवारी) संध्याकाळी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा पैठण पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. सालय चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विख्यात गोमंतकीय नाट्य अभिनेत्री डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांचे ते बंधू होते. त्यांचे पूर्ण कुटुंबच डॉक्टरी पेशात होते. "ऍक्युपंक्चर व होमिओपॅथी मेडिसीन'ची "मॉडर्न क्लिनिक' या नावाने म्हापसा, पणजी व मडगाव अशा तीन ठिकाणी ते आरोग्यसेवा बजावत होते. फोटोग्राफीचे ते भारी शौकीन होते. "व्हिजन इंडिया' या बिगरसरकारी संस्थेचे ते गोव्याचे निमंत्रक म्हणूनही काम पाहत होते."लायन्स इंडिया' नामक संस्थेच्या गोवा विभागाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग असायचा व त्यामुळे ते सर्वपरिचित होते. स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुश्रुत यांना राष्ट्रसेवेचा फार अभिमान होता. त्यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक होते. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर १९६१ साली त्यांचा जन्म झाला होता. आपल्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना आपण पोर्तुगीजांना गोव्यातून पिटाळून लावल्यानंतरच जन्माला आलो, असे ते अभिमानाने म्हणत. विद्यार्थी चळवळीत ते कमालीचे सक्रिय होते. याच काळात त्यांनी कोकणी चळवळीतही भाग घेतला व कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष या नात्याने मंडळाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी अफाट परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली आहे. विविध सामाजिक संघटनांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले.
Sunday, 2 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment