Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 8 May 2010

वाटमाऱ्या करणाऱ्या तिघा चोरट्यांना फोंड्यात अटक

फोंडा, दि.७ (प्रतिनिधी): राज्यात चोऱ्या, वाटमाऱ्या आदी प्रकरणांत हात असलेल्या तिघा चोरट्यांना फोंडा पोलिसांनी गुरुवार ६ मे रोजी मध्यरात्री कारमधून पळून जात असताना पाठलाग करून पकडले.
फोंडा पोलिस स्टेशनवरील अधिकारी, कर्मचारी, गस्तीवरील रॉबर्ट आणि रॉबिनवरील पोलिस यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे तिघे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे अनेक चोऱ्यांच्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोरट्यांनी वापरलेली एक मारुती आल्टो कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित तिसवाडी, बार्देश या भागांतील आहेत. या टोळक्याने अनेक चोऱ्यांची कबुली दिल्याचे वृत्तही हाती आले आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, बायथाखोल बोरी आणि धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या परराज्यातील मालवाहू ट्रकांना अडवून चालकांना लुबाडण्याच्या घटना ६ मे रोजी मध्यरात्री घडल्या. ह्या घटनांची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धावपळ करून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या संशयास्पद आल्टो कारचा शोध घेण्यास प्रारंभ केला. संपूर्ण फोंडा तालुक्यातील गस्तीवरील पोलिसांना सतर्क करून ह्या कारची माहिती देण्यात आली. सर्वच रस्त्यावर पोलिस सदर कारच्या मागावर होते. कुर्टी भागात संशयास्पद कार दिसताच पोलिसांनी सुमारे अर्धा तास तिचा पाठलाग केला. दोन तीन वेळा सदर चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी तिचा शोध घेण्याचे सुरूच ठेवले. सदर कार फर्मागुडीच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच येथील मुख्य रस्त्यावर अडथळा उभारण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली. त्याप्रमाणे पोलिसांनी रस्त्यावर अडथळा उभारून कार थांबविली. सदर कारच्या पाठोपाठ पोलिस अधिकारी पाठलाग करीत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
६ मे रोजी मध्यरात्री बायथाखोल, धारबांदोडा येथे पाच ते सहा ट्रक चालकांना लुबाडण्यात आल्याचे वृत्त आहे. सदर चोरट्यांना पकडण्याचा कारवाईत पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याबरोबर उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर व इतरांनी सहभाग घेतला. उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी आज (दि. ७) दुपारी फोंडा पोलिस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून या चोरट्यांची माहिती जाणून घेऊन तपासकामासंबंधी मार्गदर्शन केले आहे. उपअधीक्षक शेराफीन डायस, निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण व इतर अधिकारी तपास करीत आहेत. या चोरट्यांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर यासंबंधी माहिती दिली जाईल, असे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.

No comments: