पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): 'सरकारकडून भत्ता, रेशन मिळत नाही तर कमी शिक्षित वनवासी लोकांना संघटित करा आणि त्यांच्यामार्फत सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करून आपले ईप्सित साध्य करा'' अशी शिकवण मिळालेला जहाल तरुण नक्षलवादी शंभू गोव्यात असेच काही करू पाहत होता का, याचा तपास सध्या गोवा पोलिस घेत आहेत. आत्तापर्यंतच्या चौकशीत तो गोव्यात लपण्यासाठीच आला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस देत असले तरी शंभूचे मनसुबे काय होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
शंभूसह अन्य सोळा जणांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. "माओवादी त्रिशूल मजदूर मंच' या नक्षलवादी संघटनेचा नेता शंभू बेक, त्याचा दुसरा साथीदार राजेंद्र बार्ला व अनंत कुज्म यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली तर अन्य १४ जणांना सोडून देण्यात आले आहे. या १४ जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून शंभू गोव्यात वास्तव्य करून होता. यावेळी तो दोना पावला मिरामार, तसेच गोव्यातील अन्य भागातही फिरून आल्याची माहिती मिळाली आहे. शंभू याने कट्टर नक्षलवादी नेत्यांकडून प्रशिक्षण घेतले असून त्यांच्याकडूनच त्याला गोव्यात पैसे पुरवले जात होते, अशी माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणारे पोलिस अधीक्षक वेनू बंसल यांनी दिली.
बचावासाठी गोव्यात
शंभू या नक्षलवाद्याने सुंदरगड या जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून दहशत माजवली होती. त्याने अनेकांना गोळ्या घालून ठार केले आहे तर, अनेक सरकारी अधिकाऱ्यांना जिवंत मारण्याची धमकी दिली होती. धनाढ्य लोकांकडून खंडणी घेतल्याच्या तक्रारी त्याच्यावर नोंद आहेत. मार्च महिन्यातच त्याने गुप्ता नामक एका दारू विक्रेत्याला गोळ्या घालून ठार केले होते. गेल्या महिन्यात बॉम्बस्फोट करून एक इमारत उडवण्याच्या प्रयत्नात त्याचा साथीदार ठार झाला होता. यावेळी शंभू याचा शोध घेण्यासाठी ओरिसा पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. मात्र त्याचा कोठेच पत्ता लाग त नव्हता. तो लपण्यासाठी पळून गोव्यात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर ओरिसा पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. गोवा पोलिसांनी ४८ तास राबवलेल्या मोहिमेत शंभू अटकेत आल्याने पोलिस तसेच सुंदरगड जिल्ह्यातील नागरिक आनंदीत झाले असल्याचे ओरिसा पोलिस खात्याचे निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले.
खून प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर शंभूने नक्षलवाद्यांच्या संघटनेत प्रवेश केला. त्याच्या खुनशी स्वभावामुळे प्रभावित झालेल्या नक्षलवादी संघटनेच्या कट्टर नेत्यांनी त्याला प्रशिक्षण दिले. दर महिन्याला ते त्याला पैसेही पुरवत होते. त्याला मोबाईल घेऊन देण्यात आला होता. अद्ययावत बंदुका हाताळण्याचे खास प्रशिक्षण त्याला देण्यात आल्याची माहिती ओरिसाचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी दिली.
असा अडकला जाळ्यात
आोरिसातून रेल्वेमार्गे शंभूने गोव्यात प्रवेश केल्यानंतर सर्वांत आधी तो म्हापसा करासवाडा येथे एका झोपडीत राहणाऱ्या मित्राकडे गेला. तेथून तो भोमा येथे राहणाऱ्या ओरिसा येथील काही तरुणांकडे राहण्यासाठी गेला. या दरम्यान गोवा पोलिसांनी शंभू याची माहिती पोचली होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकही स्थापन करण्यात आले होते. अशिक्षित पण अत्यंत धूर्त असलेला शंभू रोज मोबाईलमध्ये दोन - तीन सिम कार्ड बदलत होता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते. काल दुपारी तो दोना पावला येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला परंतु तो तेथून निसटला. यावेळी पोलिसांनी भोमा येथे छापा टाकला. तेथे काही तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर तो म्हापसा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. शंभू म्हापसा येथे पोचण्यापूर्वीच पोलिस त्याच्या म्हापशातील मित्राच्या घरी पोचले. थोड्या वेळाने तो झोपडीच्या समोर असलेल्या मैदानावरून येताना दिसला. या ठिकाणी पोलिस असू शकतात याची चाहूल लागताच तो अचानक मध्येच थांबला आणि पोलिसांनी आधीच पकडून ठेवलेल्या त्याच्या मित्राशी त्याने मोबाईलवरून संपर्क साधला. ""मला तहान लागली आहे. पाणी घेऊन ये. मी मैदानात तुझी वाट पाहतो'', असे सांगून त्याने मित्राला झोपडीतून बाहेर बोलावले. यावेळी पोलिसांनी त्याला पाणी घेऊन बाहेर जाण्यास दिले. पाणी पिताना शंभूने त्याला पोलिस आले होते का, अशी विचारणा केली. हे सर्व संभाषण पोलिस त्याच्याकडे असलेल्या मोबाईलवरून ऐकत होते. परंतु, एकाएकी शंभू आलेल्या वाटेनेच पुन्हा जाऊ लागल्याने आधीच संपूर्ण मैदानाला वेढा घालून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यात म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रवीण वस्त, उपनिरीक्षक सुनील गुडलर, आयआरबीचे जवान तसेच अन्य पोलिसांचा समावेश होता.
Saturday, 8 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment