आमदार दयानंद नार्वेकरांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
पाणी व वीज पुरवठ्यातील घोळामुळे सरकार बदनाम
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा पाणी विभाग व वीज खाते यांच्या निष्क्रियतेमुळे या सरकारची बदनामी होत असल्याचा ठपका माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी ठेवला आहे. बार्देश तालुक्यात व प्रामुख्याने पर्वरी भागाला पाणीपुरवठा अजूनही सुरळीतपणे होत नाही. सरकारकडून एकीकडे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प दक्षिण गोव्यासाठी राबवले जात आहेत; पण उत्तर गोव्यातील जनतेला पाणी व विजेसारख्या प्राथमिक गरजाही पुरवण्यात सरकारला अपयश येत असल्याची कडकडीत टीका त्यांनी केली आहे.
नार्वेकर यांनी आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. आपण पाणी टंचाईचा विषय गेली दोन वर्षे सातत्याने विधानसभा व अन्य ठिकाणी प्रकर्षाने उपस्थित करीत आहोत, पण या त्याकडे पूर्ण कानाडोळा करून पाणी व विजेसारख्या प्राथमिक गरजांकडे सरकार करीत असलेले दुर्लक्ष दुर्दैवी आहे, अशी नाराजीही नार्वेकरांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यात अनेक निर्णयही घेण्यात आले. प्रत्यक्षातआत्तापर्यंत एकही निर्णय फळाला आलेला नाही.
सरकारकडूनच बार्देश व डिचोली भागांत दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात याला काय म्हणावे,असा सवालही त्यांनी केला. पर्वरी भागात खास करून गेल्या दोन वर्षांत अनिर्बंध बांधकामांना परवाने देण्यात आले. वीज पुरवठ्याचा कोणताही अभ्यास न करता वीजजोडण्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच या भागात वीज व पाणीटंचाईच्या प्रश्नाने रौद्ररुप धारण केले आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
जलसंसाधन खाते एकीकडे सर्व जलाशयांत मुबलक पाणीसाठा आहे, असा दावा करते; पण खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे खुद्द सरकारकडूनच सांगितले जाते, ही काय जनतेची थट्टा सुरू आहे की काय, असा संतप्त सवाल नार्वेकर यांनी केला आहे. वीज व सार्वजनिक बांधकाम खात्यात वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्यास कोण जबाबदार? या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच हे सरकार बदनाम होत असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला.
पर्वरी हा भाग आपल्या मतदारसंघात येतो. त्यामुळे आपली या भागात नित्यनेमाने भेट असते. यापुढे या भागांत आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही इतके तेथील लोक संतापले आहेत. पर्वरी भागातील स्थानिक लोक आता या भागांतून इतरत्र स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारला गिरी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मागणी आपण केली. तिळारीचे पाणी झाडांसाठी किंवा इतर बांधकामांसाठी वापरता यावे यासाठी वेगळी पाइपलाइन टाकण्याची मागणी केली. त्यावर विचारच झाला नाही. सरकार जाणीवपूर्वक उत्तर गोव्याला हीन वागणूक तर देत नाही ना, असा संशय व्यक्त करून नार्वेकरांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Sunday, 2 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment