Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 5 May 2010

निठारीप्रकरणी कोहली दोषी

गझियाबाद, दि. ४ : निठारी हत्याकांडातील आरती या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी मोहिंदर सिंग पंढेर याचा नोकर सुरेंदर कोहली याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) दोषी ठरविले आहे. या खटल्यात ११३ सुनावण्या झाल्या. ४६ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या होत्या. त्यानंतरच न्यायालयाने आज अंतिम सुनावणी करण्याचे निश्चित केले होते. निठारीत राहणाऱ्या दुर्गा प्रसाद यांच्या सात वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी हा खटला सुरू होता.
२५ सप्टेंबर २००९मध्ये आरती शाळेतून आल्यानंतर चॉकलेट घेण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. त्यामुळे दुर्गा प्रसाद यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर २९ सप्टेंबरला पोलिसांनी संशयावरून मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंदर कोहली याला अटक केली. पंढेरच्या घरातून लहान मुलांचे कपडेही जप्त केले. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले.
सीबीआयने आत्तापर्यंत १९ खटले दाखल केले आहेत. पंढेरच्या घरातून मिळालेल्या कपड्यात आरतीचेही कपडे सापडले होते. त्यावरून सीबीआयने दुर्गा प्रसाद आणि त्यांचा मुलगा सूरज यांची डीएनए चाचणी केली. त्यानंतर पंढेरच्या घरात सापडलेली कवटी आणि दुर्गा प्रसाद यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यावरून पंढेर यानेच आरतीचा खून केल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून या खटल्याच्या सुनावणीबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पंढेर याच्या शिक्षेबाबत बुधवारी निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

No comments: