'ओडीपी' विरोधात पालिकेवर व्यापारी संघटना मोर्चा नेणार
म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी): म्हापसा शहराच्या बाह्य विकास आराखड्यामुळे (ओडीपी) येथील दुकानदार देशोधडीला लागणार असल्यामुळे तो रद्द केला जावा आणि म्हापसा बाजारात बसणाऱ्या पथविक्रेत्यांना बाजारातून कायमचे हद्दपार करावे या मागण्यांसाठी म्हापसा बाजारातील दुकानदारांनी बुधवार दि. १२ मे रोजी आपली दुकाने बंद ठेवून म्हापसा नगरपालिकेवर मोर्चा नेण्याचा निर्धार केला असून त्यानंतर या आंदोलनासंदर्भात बाजारातील मोकळ्या जागी जाहीर सभा घेण्याचा निर्णय म्हापसा व्यापारी संघटनेने घेतला आहे.
काल रात्री ८.३० वा. म्हापसा येथील सिरसाट सभागृहात म्हापसा शहराचा बाह्य विकास आराखडा २०१० याविषयी चर्चा करण्यासाठी येथील व्यापारी, वकील, वास्तुविशारद, शिक्षक, डॉक्टर व अन्य नागरिकांसाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हा आराखडा म्हणजे सबंध म्हापसा शहर बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान आहे. शहरात शिल्लक राहिलेल्या जमिनीमध्ये ९-१, ८-२ प्रकल्पाच्या इमारती उभारण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. मार्केटच्या आसपास असलेल्या शेतजमिनी हडप करण्याचे कट कारस्थान येथील ठकसेनांनी रचले आहे, असा आरोप यावेळी नारायण कारेकर यांनी केला.
म्हापसा शहरात गरज आहे त्या ठिकाणी २० मीटरचा रस्ता दाखवलेला नाही. मात्र मार्केटमध्येच २० मीटरचा रस्ता दाखवण्याचे प्रयोजन काय? असा सवालही यावेळी करण्यात आला. बाजारातील गटारांवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील गटारे भरून गेलेली आहेत. त्यामुळे म्हापसा शहर पावसाच्या पाण्याने बुडण्याची शक्यता आहे. या आराखड्यानुसार सर्व गटार, नाले बंद केले तर सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे. या आराखड्यामुळे कदंब बसस्थानकासमोरील व हॉटेल सिरसाट समोर असलेल्या बाजारातील दोन्ही बाजूची दुकाने मोडावी लागतील. तसेच हा रस्ता मार्केटयार्डमधून सरळ शेतीतून जाणार आहे. या सर्व गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून हा आराखडा रद्द करण्यासाठी म्हापशातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी श्री. कारेकर म्हणाले.
याप्रसंगी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत गवंडळकर, जवाहर शेट्ये, प्रभाकर येंडे, चेतन साळगांवकर व इतरांनी आपले विचार मांडले. आराखडा रद्द करणे व म्हापसा बाजारातील गंभीर समस्या बनलेल्या पथविक्रेत्यांना हटवणे याविषयी प्रभाकर येंडे व चेतन साळगांवकर यांनी मांडलेला ठराव यावळी एकमताने संमत करण्यात आला. संघटनेचे सचिव रामा राऊळ यांनी आभार मानले.
Saturday, 8 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment