फोंडा, दि.५ (प्रतिनिधी): राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विश्र्वनाथ आर. वारीक यांचे आज रात्री ८ वाजता ढवळी फोंडा येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि. ६ मे रोजी सकाळी ११ वाजता फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विश्वनाथ वारीक यांचा जन्म २० ऑगस्ट १९४२ साली माशे काणकोण येथे झाला. ते गोवा पोलिस सेवेत १९६५ साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी नाशिक महाराष्ट्र येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गोवा पोलिस खात्यात पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विश्र्वनाथ वारीक ओळखले जात होते. पोलिस खात्यात काम करताना त्यांनी वाघाशी एकाकी यशस्वी झुंज दिली. त्यानंतर वाघाशी झुंजणारे अधिकारी म्हणून ते गोव्यात परिचित झाले. या शौर्याची दखल घेऊन सरकारने त्यांचा राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मान केला. राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त करणारे विश्र्वनाथ वारीक हे पहिले गोमंतकीय पोलिस अधिकारी आहेत. वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून विश्र्वनाथ वारीक यांनी उत्कृष्ट कार्य केले. या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्यपद सांभाळत असताना विश्र्वनाथ वारीक यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. पोलिस सेवत काम करण्यापूर्वी विश्र्वनाथ वारीक यांनी भारतीय नौदलात सेवा केली आहे. पोलिस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर विश्र्वनाथ वारीक ढवळी फोंडा येथे स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात भाऊ कमांडर शरद वारीक आणि कुटुंबीय आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त फोंडा भागात पसरताच त्यांचे हितचिंतक व नातेवाईक यांची त्यांच्या घरी रीघ लागली.
Thursday, 6 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment