संपूर्ण जगाचे लक्ष मुंबईकडे
मुंबई, दि. २ - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर २६।११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल आमिर कसाब आणि इतर दोन आरोपींवर चालविण्यात आलेल्या खटल्याचा उद्या निकाल लागणार असून, भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
पाकिस्तानच्या फरीदकोटचा राहणारा कसाब आणि त्याच्या इतर ९ साथीदारांनी हा दहशतवादी हल्ला करून १६६ निरपराध नागरिकांचे बळी घेतले होते. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश होता. याशिवाय ३०४ जण या हल्ल्यात जखमी झाले होते. या दहशतवाद्यांना फहीम अन्सारी आणि शहाबुद्दीन अहमद या दोघांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांनी लष्कर-ए-तोयबाच्या सांगण्यावरून ज्या ठिकाणांना लक्ष्य करायचे होते त्यांचे नकाशे व इतर माहिती पुरविली होती.
या खटल्यात ह तिघेही दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ८ मे रोजी सुरू झालेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यादरम्यान २७१ कामांच्या दिवसात ६५८ जणांची साक्ष नोंदवून ३,१९२ पानांचे पुरावे गोळा करण्यात आले होते. न्या. एम. एल. तहलियानी यांच्या न्यायालयात एकूण ३० साक्षीदारांनी कसाबची ओळख पटवली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबविरोधात जास्तीत जास्त पुरावे कसे सादर करता येतील यासाठी अथक परिश्रम घेतले. उद्या सोमवारपासून या खटल्याच्या निकालास सुरूवात होणार असून, ही प्रक्रिया आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. एखाद्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात चालविण्यात आलेल्या खटल्याचा निकाल एवढ्या लवकर लागण्याची भारतातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
आर्थर रोड कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था
दरम्यान उद्या या खटल्याच्या निकालाची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पाश्वभूमीवर आर्थर रोड कारागृह आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. न्यायालय परिसर आणि कसाबला ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे त्याभोवती अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.साने गुरूजी मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय कारागृह परिसरात वाळूच्या पोत्यांच्या भिंती तयार करण्यात आल्या असून, त्याठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून चोवीस तास पहारा देत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कारागृहासमोरील रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांचे क्रमांक नोंववून ठेवण्यात येत आहेत. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे २०० जवान तैनात करण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
Monday, 3 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment