"हॉस्पिसियू'तील दिलशान शेख मृत्यू प्रकरण
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) - नावेली - मडगाव येथील दिलशान शेख हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल हॉस्पिसियू हॉस्पिटलातील परिचारिका व दोन आया यांची अन्यत्र बदली करण्याची शिफारस आरोग्य संचालकांनी केली आहे. येत्या सोमवारपर्यंत हा आदेश लागू होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात गंभीर आजारी असलेल्या व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणाऱ्या दिलशान शेख या महिलेला प्राणवायूवर ठेवले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनताच नातेवाईकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बांबोळी येथे नेण्याची तयारी चालविली. त्याचवेळी परिचारिकेने तिचा प्राणवायू काढला. थोड्या वेळाने ती गुदमरू लागताच नातेवाईकांनी धावपळ करुन प्राणवायू लावण्याची मागणी केली. तेव्हा तो परत सुरू करण्यावरून परिचारिका व दोन्ही आयांमध्ये वाद सुरू झाला. या वादातच ती मरण पावली. त्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करुन हॉस्पिटलातील सामानाची नासधूस केली. यावेळी या एकंदर प्रकरणात वैद्यकीय अधीक्षकांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अधीक्षकांनी आपल्या अहवालात वरील तिघींना दोषी ठरवून आपला अहवाल आरोग्य संचालकांना पाठविला होता.
या घटनेच्या चार दिवस अगोदर तोतया डॉक्टर बनून आलेल्या भामट्याने प्रसूती विभागातील सविता वेळीप यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तेथे परिचारिका उपस्थित असतानाही लांबवले होते. यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने हॉस्पिटलांतील वॉर्डात सी. सी. टीव्ही कॅमेरा बसविण्याची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलात येणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मौल्यवान वस्तू घालून येऊ नये असा सल्ला द्यावा, असेही सूचित केले आहे.
Sunday, 2 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment