Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 7 May 2010

कसाबला फाशीच

४ फाशी, ५ जन्मठेप, ४९ वर्षांचा कारावास, दीड लाखांचा दंड
मुंबई, दि. ६ (सुनील कुहीकर): 'अजमल कसाब इज सेन्टेन्स्ड टू डेथ. ही शाल बी हॅंग्ड बाय नेक टील ही इज डेड'' असा निर्णय जाहीर करून, २६/११ प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे कामकाज गुरूवारी संपले. पण त्यापूर्वी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी कसाबला वेगवेगळ्या बारा गुन्ह्यांमध्ये तब्बल ४ फाशी, ५ जन्मठेप, ४९ वर्ष आणि १ महिन्याचा कारावास, आणि १,५३,४०० रुपयांचा दंड ठोठावण्याचाही निर्णय जाहीर केला.
याच आठवड्यात सोमवारी मुंबई हल्ला प्रकरणात कसाब आणि त्याच्या २० पाकिस्तानी सहकाऱ्यांना दोषी ठरविण्याचा ५२२ पानी निकाल न्यायालयाने दिल्यानंतर गुरूवारी या प्रकरणी शिक्षेची घोषणा होणार असल्याची जाहीर होताच, संभाव्य निकालाचा अंदाज बांधला जाऊ लागला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही, कसाबने केलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य बघता त्याला फाशीच दिली जावी, अशी आग्रही मागणी नोंदविली होती. नाही म्हणायला कसाबच्या वकिलांनी काही दाखले देत, त्याच्या वयाचा विचार करण्याची विनंती न्यायालयाला केली असली तरी, त्या विनंतीत तसा "दम' नव्हताच. केवळ कसाबची बाजू मांडायची म्हणून त्यांनी त्याचा बचाव करण्याचा "प्रयत्न' म्हणून ही मागणी नोंदविल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
अखेर न्यायालयाने जाहीर केलेला दिवस उजाडला. कामकाजाची वेळ बारा वाजताची ठरली असली तरी प्रेक्षकदीर्घा अकरा वाजल्यापासूनच खचाखच भरल्या होत्या. ठीक १२.४५ ला न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. या प्रकरणाचा अंतिम निकाल तयार करताना आपण कोणकोणते मुद्दे विचारात घेतले, याची माहिती न्यायमूर्तींनी कोर्टाला दिली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांचा, त्या न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतांचाही दाखला यावेळी देण्यात आला. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या २६/११ प्रकरणाची सुनावणी करताना दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व संबंधितांचे आभारही न्यायमूर्तींनी यावेळी मानले. आणि मग सुरू झाला कसाबने केलेल्या गुन्ह्यांचा पाढा आणि कोर्टाने त्याला दिलेल्या शिक्षेची घोषणा.
भारताविरुद्ध कट रचणे, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर बेछूट गोळीबार करून सात जणांना ठार करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, भारतात दहशतवादी कृत्य करणे या प्रत्येक गुन्ह्यांसाठी त्याला फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारताविरुद्ध कट रचणे, युद्ध पुकारणे, विनापरवाना शस्त्रांचा वापर, विस्फोटक पदार्थांचा वापर करून नुकसान पोहोचविणे, "कुबेर' बोटीचा चालक अमरसिंह सोळंकी याचे अपहरण करून त्याचा गळा चिरून खून करणे या गुन्ह्यांसाठी कसाबला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दरोड्यासाठी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड, दरोड्यात संबंधित व्यक्तीला जिवे मारल्यावरून ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजारांचा दंड, कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना मारल्यावरून ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजारांचा दंड, संयुक्त कट रचून दहशतवादी कृत्य केले म्हणून ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजारांचा दंड...अशा प्रकारे एकूण बारा गुन्ह्यांसाठी कसाबला तब्बल ४९ वर्ष आणि १ महिन्याचा कारावास आणि एकूण १,५३,४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात सर्वांत कमी १ महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेचा आणि शंभर रुपयांच्या दंडाचाही समावेश आहे.
दुपारी १.३३ वाजता पहिल्या फाशीची घोषणा झाली. इतर सर्व गुन्हे, त्याचे कलम, शिक्षा यांची घोषणा करता करता फाशीच्या शिक्षेचे शेवटचे वाक्य जाहीर करून न्यायालय उठले तेव्हा घड्याळात १.५९ वाजले होते. कसाबला फाशीची शिक्षा ठोठावताना न्यायालयाने अगदी स्पष्ट मते व्यक्त केली. व्यवस्थित योजना आखून हा हल्ला करण्यात आला होता. ही योजना यशस्वी व्हावी याचेही पूर्ण नियोजन "लष्कर-ए- तोयबा' या दहशतवादी संघटनेने केले होते. या दहशतवादी संघटनेचा कसाब हा सदस्य होता. भारतावर हल्ला करण्यासाठी तो कमालीचा उत्सुक होता. अशावेळी त्याचे वय कमी की जास्त हा फार दखलपात्र मुद्दा होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने यावेळी मांडली.
दुर्बल? छे! हा तर निष्ठुर!
कसाब हा भावनिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा त्याच्या वकिलांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. तो भारतावर हल्ला करण्याच्या मानसिकतेतूनच येथे आला होता. इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर वृद्ध, महिला व बालकांवर देखील त्याने निष्ठुरपणे गोळीबार केला. त्याच्यासारख्या, नियोजनबद्ध पद्धतीने भारतावर हल्ला करणाऱ्या नराधमाला दयामाया दाखविणे समाजाच्याही हिताचे नसल्याचे मत न्या. एम. एल. तहलियानी यांनी यावेळी व्यक्त केले. त्याच्यासारख्या दहशतवाद्याकडे मानवीय दृष्टिकोनातून बघितले, तर सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वासच राहणार नाही, असेही मत सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
मला काहीही बोलायचे नाही...!
तुझ्याविरुद्ध लावले गेलेले आरोप सिद्ध झाले आहेत. तुला किमान तीन-चार प्रकरणात फाशीची शिक्षा होऊ शकते. तुला काही सांगायचे आहे? न्यायालयाने विचारलेला हा प्रश्न ऍड. के. पी. पवार यांनी आरोपीच्या पिंजऱ्यातल्या कसाबला विचारला. तेव्हा, ""नाही, आपल्याला काहीच बोलायचे नाही'', असे त्याने सांगितले. जे व्हायचे ते होईल, अशा थाटातले त्याचे हावभाव त्यावेळी होते. फाशीची शिक्षा ठोठावली गेली तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले नव्हते. शेवटी त्याला कोर्टाबाहेर पाठवून देण्यात आले. आता ऍड. के. पी. पवार यांना कसाबची भेट घालून दिली जाणार आहे. न्यायालयाचा निकाल समजावून सांगून त्यावर त्याचे काही म्हणणे असेल तर ते त्याच्या वकिलामार्फत न्यायालयाला कळविले जाईल.

No comments: