कसाब, तू रडत राहा
मुंबईच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावताच कसाब म्हणे ढसाढसा रडला. रड, मानवतेवर घाला घालणाऱ्या राक्षसा मनसोक्त रडून घे, फाशीचा दोर गळ्याभोवती आवळला जाईल तेव्हा तुला रडताही येणार नाही. तुझे भेसूर रडणे जरा आसमंतात घुमू दे. जगात जिहादी दहशतवादाचा धुमाकूळ घालण्याचे किडे ज्यांच्या डोक्यात वळवळत आहेत, त्यांना जरा कळू दे की दहशतवादाची मस्ती केली, अखेर ढसाढसा रडण्याची वेळ येते. रडण्याच्या शेवटी फासाचा दोर गळ्यात पडतो. म्हणून कसाब तू फाशीपर्यंत रडत राहा. कसाबच्या रडण्याचा भेसूर आवाज त्याच्या पाकिस्तानात बसलेल्या मस्तवाल प्रमुखांपर्यंत पोहोचला पाहिजे, मरणाची भीती काय असते त्यांना कळले पाहिजे. आणखी मस्ती केली तर कसाबच्या फासाचा दोर उद्या आपल्या गळ्यापर्यंत येईल, किंवा शूर भारतीय जवान कसाबच्या इतर साथीदारांप्रमाणे खात्मा करून कयामतचा इंतजार करण्यासाठी जमिनीत गाडून टाकतील. जगाला हे समजू दे की, भारत हा भेकडांचा देश नाही, तर उदार मानवतावाद येथे आहे. तसे "स्वयमेव मृगेंद्रता' येथे आहे. येथे मानवतेशी, मूल्यांशी कोणी बेईमानी करेल, तर त्याला देहान्त प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही.
अझमल कसाबला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सुनावलेली फाशी एकेरी फाशी नाही, तर चार वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी फाशीला तो पात्र ठरला आहे. न्यायालयाने आज शिक्षा सुनावण्याच्या आधी कसाबला काही सांगायचे आहे काय, असे विचारत संधीही दिली होती. मात्र, काही बोलायचे नाही, असे तो म्हणाला. मात्र, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कसाबने आणलेले उसने अवसान गळून पडले आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला. ज्याने शेकडो निरपराध लोकांना गोळ्या घातल्या तो उरफाट्या काळजाचा हल्लेखोर कितीही रडला, तरी त्याचे इथे कोणाला काही कौतुक वाटायचे कारण नाही. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, तर त्याचे हे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचे म्हटले. मात्र, असे वाटते की त्याचे हे रडणे म्हणजे जिहादी दहशतवादाची अखेर आहे. कसाब रडतच राहिला पाहिजे तर या देशातही ज्यांच्या डोक्यात जिहादी दहशतवादाचे विचार वळवळत असतील त्यांना या कसाबच्या रडण्यातून मरणाची भीतीची कल्पना येईल!
भारतात दहशत पसरवायची, निरपराध लोकांना ओलीस ठेवून भारत सरकारला झुकवायचे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेत पुन्हा जिहादी आतंक देशात पसरवायचा, असा बेत करून हे उरफाट्या काळजाचे लोक भारतात घुसले होते. मारत मारत मरण्याचा संकल्प करून हे मानवी बॉम्ब मानवतेचे लचके तोडण्यासाठी इकडे आले होते. त्यातला हा कसाब! याने न्यायालयातही अनेक माकडचेष्टा केल्या. मनमानी करीत त्याच प्रश्नाची कधी होकारार्थी, तर कधी नकारार्थी उत्तरे दिलीत. भारतीय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटल्याप्रमाणे हा खटला जगासमोर एक उदाहरण आहे की भारतात कायद्याचे राज्य आहे. कसाबसारख्या देशद्रोही गुन्हेगाराला न्यायालयात पूर्ण संधी दिली गेली. त्याच्यावरील आरोपांची संपूर्ण शहानिशा करूनच त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली. पण आता आणखी उदार धोरण न ठेवता मकबूल भटप्रमाणे याची पुढील न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण करून याला फासावर लटकविले पाहिजे. आता उच्च न्यायालय, नंतर सर्वोच्च न्यायालय आणि नंतर दयेचा अर्ज. दयेच्या अर्जाची जी औपचारिकता आहे ती जरा देशद्रोही आरोपींच्या बाबतीत वेगाने पूर्ण केली पाहिजे. सध्या राष्ट्रपतींकडे दयेचे २९ अर्ज प्रलंबित आहेत. फाशीची शिक्षा होण्यासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांवर इतके दिवस तरी मेहेरनजर कशाकरिता करायची? मंत्रिमंडळाच्या शिफारसीनंतरच दयेच्या अर्जावर निर्णय होत असतात, तर मग या धोकादायक गुन्हेगारांवर मंत्रिमंडळ कशाकरिता दया करते आहे? विशेषत: कसाबसारखे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी फाशीच्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यांनी शेकडो निरपराध लोकांना गोळ्या घातल्या, ज्यांनी या सार्वभौम देशाच्या विरोधात कटकारस्थान केले, ज्यांनी या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारले, इथल्या शूर पोलिस अधिकाऱ्यांना बेसावध असताना गोळ्या घातल्या, अशा आरोपीसाठी दया हा शब्द उच्चारण्याचादेखील अधिकार नाही.
मात्र कसाबला फाशी झाली म्हणून मुंबईत फटाके फोडणे वगैरे जो प्रकार झाला त्याची संभावना बालिशपणा अशीच केली पाहिजे. हा प्रकार टाळला जायला हवा होता. आपल्या देशावरील प्रेमाचे, देशभक्तीचे असे सवंग प्रदर्शन करणे ही आपली संस्कृती नाही.
हा कसाब न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दयेच्या अर्जाचा फार्स होईपर्यंत तुरुंगात सरकारी बडदास्त उपभोगत राहाणार, पुन्हा कंदाहारच्या विमान अपहरणासारख्या प्रकरणांची किंवा काश्मीरमध्ये रुबियाच्या अपहरणासारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याची इच्छा मस्तवाल अतिरेक्यांना होणार. ही असली लाजिरवाणी घटनांची जंत्री घडविण्याची पुन्हा कशाला संधी द्यायची? या विषयाचा गंभीर विचार करण्याची वेळ आहे. कसाबचे रडणे पाकिस्तानच्या मस्तवाल नापाकांपर्यंत गेले पाहिजे. तसे ते जगात आमचीच पोलिसगिरी चालते अशा गुर्मीत राहणाऱ्या अमेरिकेतील व्हाईटहाऊसपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कसाब तू रडत राहा!
फजल, तू बोलत राहा
इकडे कसाब रडतो आहे तिकडे अमेरिकेत फजल पोपटासारखा बोलतो आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क कारबॉम्ब प्रकरणात अमेरिकेच्या तपास यंत्रणेने फजल शाहजाद याला अटक करून बोलते केले आहे. त्याने दहशतवादी प्रशिक्षण पाकिस्तानात घेतल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फजल तू बोलत राहा. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांची माहिती पुराव्यासह अमेरिकेला दिली होती. मात्र, जगाच्या कानाकोपऱ्यातील दहशतवाद संपविण्याची बुश यांची घोषणा तात्पुरती तालिबान संपविण्यापुरतीच होती, असे त्यावेळी लक्षात आले. आता पाकिस्तानचा नापाक दहशतवाद अमेरिकेच्या चौकात पोहोचताच आता व्हाईटहाऊसला जाग येईल. फजल आता बोलू लागला आहे. फजलच्या बोलण्यावरून पाकिस्तानात दहशतवाद चालविणाऱ्या सात जणांना अटकही झाली आहे. दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेबरोबर आपण आहोत असे दर्शविण्यासाठी असल्या किरकोळ लोकांना अटक करण्याचे नाटक पाकिस्तानातील राज्यकर्ते तत्परतेने करतील. मात्र, या दहशतवादामागे काही व्यक्ती फक्त नाहीत, तर पाकिस्तानातील राज्यकर्ते, पाकिस्तानातील गुप्तचर संघटना, पाकिस्तानातील लष्करी अधिकारी हे सर्वजण या दहशतवादाला पोसण्यात सहभागी आहेत, हे अमेरिकेला कळेल. त्याकरिता फजल बोलत राहिला पाहिजे.
आता वेळ आली आहे की जागतिक समुदायाने आपापल्या सोयीने दहशतवादाचा विचार न करता जगातून जिहादी दहशतवाद निपटून काढण्यासाठी कृती केली पाहिजे. एकेश्वरवादातून जिहादी मानसिकतेचा जन्म झाला आहे. भारतीय जीवनदर्शन साऱ्या जगाला पावन करणारे आहे याची जाणीव ठेवून दशतवादाला मूठमाती देण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित विचार करण्याची गरज आहे. अमेरिकेने दांभिकता आणि अहंकार सोडून शाश्वत विचार केला पाहिजे. नाहीतर त्यांनी उभे केलेले भस्मासुर त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला येतात याचे किती अनुभव घेतल्यावर त्यांना शहाणपण सुचणार आहे? हे शहाणपण जगाला सुचण्यासाठी फजल बोलत राहिला पाहिजे. पाकिस्तानी नापाक दहशतवादाची रहस्ये जगाच्या वेशीवर खोलत राहिला पाहिजे!
Friday, 7 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment