सांग्यात खनिज वाहतुकीने घेतला तरुणाचा बळी
सांगे, दि. ४ (प्रतिनिधी): भरधाव वेगाने सुरू असलेल्या खनिज वाहतुकीने सांगे येथे आणखी एक बळी घेतला असून मार्टिन फर्नांडिस (तारीपाटो - सांगे) हा युवक ठार झाला. शनिवार दि. ८ मे रोजी मार्टिन याचे लग्न होते, त्याच्या अपघाती निधनामुळे तारीपाटो भागावर शोककळा पसरली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मार्टिन आपल्या जीए ०९ सी ०७३८ क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीने कार्यीखाटे सांगे येथे आपल्या भावाकडे गेला होता. तेथील काम आटोपून परतत असता सुसाट वेगाने सावर्डेच्या दिशेने निघालेल्या जीए ०८ यू ८८१८ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. यावेळी मार्टिन ट्रकच्या चाकांमध्ये अडकला व सुमारे २० ते २५ मीटर फरफटत गेला. त्याला तत्काळ सांगे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीचे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रिवण येथे खनिजवाहू ट्रकाखाली सापडून रिवणकर यांचा मृत्यू होण्याची घटना ताजी असताना झालेल्या या अपघातामुळे सांगे भागात संतापाचे वातावरण पसरले आहे. मार्टिन याचा विवाह शनिवार दि. ८ मे रोजी होणार होता. विवाहाची पूर्वतयारी तसेच लग्नपत्रिका वितरित करण्याच्या कामात तो गेले काही दिवस व्यस्त होता. आपले नातलग तसेच मित्रमंडळींना लग्नपत्रिका देऊन आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असलेल्या मार्टिनवर खनिज वाहतुकीच्या रूपाने आलेल्या क्रूर काळाने झडप घातल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव वेगाने सुरू असलेली खनिज वाहतूक मार्टिनच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याने संतप्त नागरिकांनी घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. सांगे भागातील खनिज वाहतुकीसाठी बगल रस्ता किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. उद्याही येथील वाहतूक रोखून धरण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, सांगे पोलिसांनी ट्रकचालक गोविंद चव्हाण (सुकतळे मोले) याला अटक केली आहे.
Wednesday, 5 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment