उद्या आगमन
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राज्यात कॉंग्रेस आघाडी सरकारने सामान्य लोकांचे जगणे हैराण केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर, भ्रष्टाचाराचा कळस, बेकायदा खाणींचा उच्छाद आदी अनेक प्रकरणांमुळे जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या ७ रोजी येथील आझाद मैदानावर आयोजित होणाऱ्या जाहीर सभेतून या असंतोषाला वाट मोकळी करून दिली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
आज प्रदेश भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गोवा भेटीवर येणारे नितीन गडकरी यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रदेश भाजपने चालवली आहे. श्री. गडकरी यांच्या भेटीमुळे प्रदेश भाजप कार्यकर्त्यांत नवा उत्साह व जोम पसरला आहे व त्यामुळे ही जाहीर सभा विराट तर होईलच, त्याचबरोबर राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या जनताविरोधी कारवायांविरोधात या सभेतून रणशिंगच फुंकले जाईल, असा विश्वासही प्रा. पार्सेकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय समिती बैठक, दिल्लीतील महागाईविरोधातील महारॅली इत्यादी कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर ते गोव्यात दाखल होत आहेत.
येत्या ६ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांचे आगमन दाबोळी विमानतळावर होईल. या ठिकाणी मुरगाव व वास्को मतदारसंघातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. तदनंतर सांकवाळ येथेही तेथील कार्यकर्त्यांमार्फत त्यांचे स्वागत होईल. राजधानीत पोहोचल्यानंतर ११.३० च्या सुमारास ते गोव्याचे भाग्यविधाते तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरामार येथील त्यांच्या समाधीला पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहतील. दुपारी ते पत्रकारांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता म्हापशाचे आमदार तथा भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तदनंतर ५.३० वाजता भाजप मुख्यालयात प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा समिती तथा इतर संघटन पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता विशेष निमंत्रितांबरोबर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.
७ रोजी सकाळी प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांच्या पर्वरी येथील निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होईल. दुपारी विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांशी वार्तालाप व जेवण होईल. संध्याकाळी ४.३० वाजता आझाद मैदानावरील विराट जाहीर सभेला ते संबोधीत करतील. या जाहीर सभेची संपूर्ण तयारी प्रदेश भाजपने केली आहे. वाहनांसाठी पार्किंगची सोय कांपाल फुटबॉल मैदानावर करण्यात आली आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या जाहीर सभेच्या आयोजनाचे व विविध कार्यक्रमांचे प्रमुख म्हणून सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हे काम पाहत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Wednesday, 5 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment