वाहनचोरांची टोळी व वाहतूक अधिकाऱ्यांचे साटेलोटे शक्य
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- पणजी पोलिसांनी छडा लावलेल्या वाहन चोरी प्रकरणात मोठ्या प्रमाणात बोगस वाहन नोंदणी पुस्तिकांचा ("आरसीबुक्स') वापर झाल्याचे आढळले आहे. पणजीचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी यासंबंधी वाहतूक खात्यास पत्र पाठवून आरसी बुक वितरण व्यवस्थेवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. वाहतूक खात्याकडूनच बोगस आरसी बुकांचे वितरण झाल्याचा संशय असून त्यामुळे वाहनचोरांची टोळी व वाहतूक खात्यातील काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पणजी पोलिसांनी अलीकडेच आलिशान गाड्या भाड्याने घेण्याच्या निमित्ताने त्यांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. या वाहनचोरी प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणात बोगस आरसी बुक्सचा वापर झाल्याचेही उजेडात आले आहे. ही आरसी बुक्स एक तर गोव्याबाहेर तयार करण्यात आली असावीत किंवा वाहतूक खात्यातीलच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचे वितरण झाले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतूक खात्याच्या कारभाराबद्दलच संशय निर्माण झाला आहे. राज्यात सर्वांत जास्त गोलमाल या खात्यातच होतो हे उघड गुपीत आहे. अनेकांना हा अनुभव आला आहे. याबाबत "जय दामोदर' संघटनेचे नेते महेश नायक तसेच अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, सुदेश चोडणकर आदींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
दरम्यान, राज्यात वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे पेव फुटले असून त्यावर सरकारचे नियंत्रण उरलेले नाही. या संस्थांची कामे सर्व "आरटीओ' कार्यालयात "सुरळीत' पार पडतात. या संस्थांकडून काही वाहतूक अधिकाऱ्यांना दरमहा "बक्षिसी' दिली जात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या वित्तसंस्थांमुळेच राज्यात दुचाकी व हलक्या वाहनांचे पेव फुटले आहे. राज्यात विविध ठिकाणी या संस्थांची गोदामे आहेत व तिथे हजारोंच्या संख्येने जप्त केलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. या गोदामातील अनेक वाहनांचे सुटे भाग तिथे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच लांबवले जाण्याचे प्रकार घडत असतात, अशीही माहिती मिळाली आहे. या वित्तसंस्थांकडून वाहन नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून वाहन हातात सोपवण्याची पद्धत असते. सध्या आरसी बुक मिळवण्यासाठी किमान एक महिना लागतो. त्यामुळे काही लोक आरसी बुक न नेता केवळ वाहन नोंदणीची पावती आपल्या पर्समध्ये ठेवून काम भागवतात. या वित्तसंस्थांकडून नोंदणी झालेल्या अनेक वाहनांत घोळ झाल्याचेही प्रकार यापूर्वी दिसून आले आहे. चुकीचा नोंदणी क्रमांक देणे किंवा वाहन नोंदणी केल्याची खोटी पावती देऊन खोट्या क्रमाकांने वाहन नोंदणी होण्याचेही प्रकार आढळले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास त्यातून अनेक भानगडी उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sunday, 2 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment