पोलिसांचे दुर्लक्ष की सहकार्य?
प्रीतेश देसाई
पणजी जि. २ - गोवा पोलिस खात्याच्या आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या नाकावर टिच्चून खुलेआम पणे "गोऱ्या मेम' ना हाताशी धरून सेक्स रॅकेट चालवण्याचा धंदा गोव्यात जोमाने सुरू असल्याची माहिती उघडकीस आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून हा धंदा जोरात सुरू असून पोलिस यंत्रणा मात्र झोपी गेल्याचे सोंग घेऊन वावरत आहे. कोणाच्या आशीर्वादाने या व्यवसायाला गुप्त संरक्षण दिले जात आहे, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिस खात्याच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वर्तमानपत्रात लेख लिहून या "धंद्या'बद्दल वाच्यता फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याकडेही या खात्याने दुर्लक्ष केले. या व्यवसायात प्रचंड पैसा असल्याने आंतरराष्ट्रीय माफिया येथील काही दलालांना हाताशी धरून हा धंदा चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या व्यवसायातील पैसे दहशतवादी कारवायांसाठीही वापरला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्यात जोम धरू पाहणाऱ्या या "देशी' व "विदेशी' ललनांच्या शरिरविक्रीच्या धंद्यावर आळा बसवण्यात मात्र गोवा पोलिसांना अद्याप तरी अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्री व्यवसायात आधीच गुंतलेल्या या रशियनांचा आता या धंद्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती आहे. पोर्तुगीज जोखडातून मुक्त असलेला गोवा आता रशियनांच्या घशात जाण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. व्यापारानिमित्त गोव्यावर ताबा मिळवलेले पोर्तुगीज गेले आणि "व्यवसाया'निमित्त गोव्यावर नजर रोखून असलेले विदेशी गोव्याला गिळंकृत करण्यासाठी आले आहेत. केवळ राज्यातील जमिनीच नव्हे तर इथल्या संस्कृती आणि सभ्यतेलाही घशात घालण्याचा या "विदेशीं'चा डाव असावा.
राज्यातल्या गर्भश्रीमंत, आणि विदेशी पर्यटकांवर नजर केंद्रित करून खास पाश्चिमात्य भूमीवरील "ललनां'ना गोव्यात आयात करण्याचे प्रकार गोव्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. संकेत स्थळावर या गोऱ्या कांतीच्या ललनांचे छायाचित्र टाकून येथील दलालांचे दूरध्वनी क्रमांक त्यावर देण्यात आले आहे. या निळ्या डोळ्यांच्या, गोऱ्या कांतीच्या आणि सुवर्ण कुंतलधारी ललनांसाठी एका वेळेस १००० डॉलर्स म्हणजे ४५ हजार रुपये रोख रक्कम दिली जाते. त्यांचा सौदा करणारे हे राज्यातील वा देशातील मोठमोठे उद्योजक वा विदेशातील लक्ष्मीपती असतात. या विदेशी बालांचा थाट अगदी न्यारा असतो. त्यांची ने-आण करण्यासाठी लक्झरी गाडी तर त्यांना उतरण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्या आरक्षित केल्या जातात. एक स्थानिक वाहन चालक त्यांच्या योग्य ठिकाणी ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारतो. प्रथमदर्शनी कुणालाही "टुरिस्ट' भासाव्यात अशा या विदेशी वारांगना जिथे पाश्चिमात्य पर्यटक, उद्योजकांची गरज भागवतात, तिथेच स्थानिक "पैशेकारां'चीही साथ देतात. रेव्ह पार्टी व एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत त्यांच्या कुशीत बसून त्यांचा "भाव' वाढवण्याचे कार्य ते करतात. राज्यातल्या मोरजी, कळंगुट, हणजूण तसेच साळगाव आणि आता पणजी सारख्या भागातही हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
देशी धनाढ्य आणि विदेशी "क्लाईंट' यांच्यावर नजर ठेवून, जिथे अमली पदार्थांची आवक त्यांनी राज्यात वाढवली आहे, त्याप्रमाणेच मदनिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढवली जात आहे. खास "विदेशी मेम' राज्यातल्या "देशी' वारांगनांना मागे टाकत राज्यात आपला जम बसवत आहेत. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात काही पाश्चिमात्य मुली या कामात गुंतल्या असून, सायबर कॅफेत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशी विदेशी ग्राहकांना आपल्या गळी उतरवत आहेत. त्यांना स्थानिकांची मदत मिळत असून, हे स्थानिक युवक त्यांच्या, त्यांना राज्यात आणलेल्यांच्या आणि ग्राहकांच्या दरम्यान "दुवा' साधतात.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे "या' मुलींचे एका पोलिस अधिकाऱ्याशी संबंध असून, किनारी भागात त्यांना वारंवार एकत्रही पाहिले गेले असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार कुंपणच शेत खात असल्याप्रमाणे असून, त्याला वेळीच आळा घातला गेला नाही तर राज्यात दिवसेंदिवस बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्यास फार काळ लागणार नाही.
Monday, 3 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment