Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 2 May 2010

फर्मागुडी योग शिबिराला प्रचंड प्रतिसाद


देशातील योगक्रांतीचा शुभारंभ गोव्यातून - बाबा रामदेव


फोंडा, दि.१ (प्रतिनिधी) - भारत स्वाभिमान ट्रस्टच्या गोवा शाखेने फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित केलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या चार दिवसीय योग विज्ञान शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.
योगगुरू रामदेव यांच्या गोव्यात २००६ साली पहिल्यांदाच झालेल्या योग शिबिराचा विक्रम फर्मागुडीच्या या योग विज्ञान शिबिराने मोडला आहे. या शिबिराला आयोजकांच्या अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळालेला नसला तरी या शिबिरात वीस ते पंचवीस हजार लोकांनी भाग घेतला. "सुशोगाद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात योगाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल बाबा रामदेव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
देशातील योग क्रांतीची सुरुवात गोव्यातून होत आहे. या शिबिरामुळे गोव्यातील योगाच्या प्रचार व प्रसाराला नवी दिशा मिळेल. योगाच्या माध्यमातून गोवा हे आदर्श राज्य बनू शकते, असा विश्र्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.
या योग शिबिराला पहाटे ठीक ५ वाजता प्रारंभ झाला. योगगुरू स्वामी रामदेव यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर टाळ्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. बाबा रामदेव यांनी या शिबिरात योगाच्या विविध आसनांची सविस्तर माहिती देऊन आसने करून घेतली. विविध प्रकारच्या आसनांचे फायदे विशद करून सांगितले. तसेच लोकांनी आहार कोणता आणि कशा पद्धतीने घ्यावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
मनुष्याने प्रत्येक दिवसाची सुरुवात योग, आयुर्वेद आणि स्वदेशीने केली तर जीवनात सुखाची प्राप्त होऊ शकते, असे सांगून स्वामी रामदेव म्हणाले की, शरीर हे एक यंत्र आहे. योगाच्या माध्यमातून हे यंत्र कायम सुस्थितीत राखता येते. प्राणायाम केल्याने मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. त्यामुळे लहान मुलांकडून जास्त प्रमाणात प्राणायाम करून घ्या. योगाच्या साहाय्याने असाध्य रोगावर उपचार केले जाऊ शकतात. योगाच्या साहाय्याने असाध्य व्याधींवर उपचार करून रुग्णांना जीवदान दिलेले आहे.
शीतपेय आरोग्याला घातक आहेत. लहान मुलांना शीतपेय देऊ नका. शीतपेय कंपन्यांनी सुध्दा हे मान्य केले असून विदेशात शाळांमध्ये शीतपेयांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. भारतात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. गोवाही यात मागे नाही. शीतपेय घातक असून त्यापेक्षा शुद्ध पाणी, लिंबू पाणी, ताक प्या. टूथपेस्टमध्ये घालण्यात येणारी रसायने दातांच्या हिरड्यांसाठी घातक आहेत. त्यामुळे स्वदेशी टूथपेस्टचा वापर करा, अशा मौलिक सूचना बाब रामदेव यांनी केल्या.
व्यसने, अनारोग्य यावर सुमारे पंधरा लाख कोटी रुपये नाहक खर्च होत आहेत. ताण - तणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होते. योगामुळे व्यसने आणि औषधे सुटतील. शाकाहारी बना आणि निरोगी राहा. घरामधील वातावरण चांगले राहिले, तरच समस्या सुटतील, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
भारत स्वाभिमानाने योग क्रांती माध्यमातून एक आदर्श नागरिक, गाव, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गावातून योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशातील विविध भागात योग वर्गाचे आयोजन केले जात आहे. गावात झाडे लावणे, नैसर्गिक पाण्याचे संवर्धन, औषधी वनस्पतीबाबत जागृती, शेती, अस्वच्छता याबाबत जागती करण्याचे काम हाती घेतले आहे. शिक्षणामध्ये गुणात्मक विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रासायनिक खतांच्या शेतीमुळे जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, असेही स्वामींनी सांगितले.
मैदानावर लावण्यात आलेल्या स्क्रीन तांत्रिक दोषामुळे बंद पडल्यामुळे मैदानावर मागच्या बाजूला बसलेल्या लोकांना काहीच दिसत नव्हते. त्यामुळे योग आसनांची प्रात्यक्षिक करताना अडचण होत होती. स्क्रीन बंद पडल्याने लोकांना झालेल्या गैरसोयीची दखल रामदेव स्वामी यांनी त्वरित घेतली. शिबिराला येणाऱ्या लोकांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध होती. मात्र, फर्मागुडी सर्कल ते अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यानच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. गोव्यातील काणकोण ते पेडणे आणि वास्को ते सत्तरी या भागातील लोक शिबिरात सहभागी झाले होते. त्याचबरोबर शेजारील सिंधुदुर्ग, कारवार, बेळगाव आदी भागांतील नागरिकही शिबिराला उपस्थित होते.
शिबिराच्या ठिकाणी हरिद्वार येथील ३७ वैद्य उपस्थित आहेत. आजारी व्यक्तींची तपासणी करण्याचे काम ह्या वैद्यांनी सुरू केले आहे. रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. शिबिराच्या ठिकाणी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधेही उपलब्ध करण्यात आली आहेत.

No comments: