ब्रिजटाऊन, दि. ६ : भारताचा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर आठच्या फेरीतील पहिलाच सामना उद्या ७ मे रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजी मजबूत करायची की ज्यांच्यावर भरोसा टाकता येणार नाही, त्या फिरकीपटूंचा वापर करायचा, अशा द्विधामन:स्थितीत आज भारतीय संघ आला आहे. भारताजवळ पाचव्या गोलंदाजाची कमी भरून काढण्यासाठी अनेक फिरकीपटू आहेत.
केंसिंगटन ओवलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात तज्ज्ञ वेगवान गोलंदाजांचा वापर केला जाऊ शकतो आणि तशी योजनाही भारतीय संघ व्यवस्थापनातील "थिंकटॅंक' तयार करीत असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेणारा झहीर खान या सामन्यात खेळणे जवळपास निश्चित आहे. दणकेबाज फलंदाज गौतम गंभीरही आजारपणातून बरा झाला असून तो सामन्यासाठी "फिट' आहे. भारतीय फलंदाजी आता मजबूत झाली आहे. मात्र, योजना आखणाऱ्यांसमोर गोलंदाजांची निवड ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दोन्ही संघांत बिग हिटर्स आहेत. मात्र, वन-डे क्रिकेटमध्ये दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाजीचे पारडे जड आहे. ड्रिक नॅनीस, शॉन टेट, मिशेल जॉनसन आणि शेन वॅटसन यांनी आतापर्यंत चांगली व प्रभावी गोलंदाजी केली आहे. गौतम गंभीर सामन्यासाठी तंदुरुस्त असला तरी अद्याप पूर्णत: फॉर्ममध्ये आलेले नाही. अशास्थितीत त्याने समाधानकारक फलंदाजी केली नाही तर भारताचा पुढील मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे. गंभीरला सूर गवसला नाही तर सुरेश रैनाची जबाबदारी वाढून जाईल. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शानदार प्रदर्शन करून ६० चेंडूत १०१ धावा काढल्या होत्या. रैनाचा फॉर्म आणि त्याची सामना जिंकण्याची क्षमता पाहता ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याच्याविरुद्ध विशेष योजना आखून मैदानात उतरले तर नवल वाटायला नको. त्यामुळेच त्याला या सामन्यात जास्तीत जास्त शॉर्ट चेंडूचा सामना करावा लागणार आहे. युवराजसिंगने आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात अनुक्रमे २३ व ३७ धावा काढल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मोठ्या डावाची अपेक्षा आहे. युवराजने आपल्या बॅटची कमाल दाखविली तर तो एक धोकेबाज फलंदाज सिद्ध होऊ शकतो. हे त्याने २००० सालच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कारकीर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ८४ धावा काढून सिद्ध केले आहे.
मुरली विजय, युसुफ पठाण, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळाला तरच भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा बळावणार आहेत. आशीष नेहरा आणि प्रवीण कुमार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले तरच ते शेन वॅटसन, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क आणि हस्सी बंधूंना रोखण्यात यशस्वी होऊ शकतील आणि भारताचा पुढील फेरीचा मार्ग सुकर होईल.
भारतीय फिरकीपटूंची चिंता नाही : क्लार्क
बार्बाडोस, ६ मे आम्हाला भारतीय फिरकीपटूंपासून अजीबात धोका नाही, भारतीय फिरकीची चिंताही आम्ही करीत नाही, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने केले. भारताविरुद्ध होणाऱ्या सुपर आठ फेरीतील सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. माझे फलंदाज भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी पूर्णत: तयार आहेत, असेही तो म्हणाला.
भारतीय संघ मजबूत आहे आणि त्यात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यांच्याजवळ काही चांगले फिरकीपटूही आहेत. हरभजनसिंग सारखा जागतिक स्तराचा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. असे असले तरी आमच्याकडेही काही असे फलंदाज आहेत की जे फिरकी गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करू शकतात, असे सांगून क्लार्क म्हणाला की, हरभजनसिंग, रविंद्र जडेजासारखे नियमित आणि युसुफ पठाण व युवराजसिंगसारखे अंशकालिन फिरकी गोलंदाज सध्या चांगले प्रदर्शन करीत आहेत. या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे म्हणणे असे आहे की, स्पर्धेत फिरकी गोलंदाज महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहेत, तर वेगवान गोलंदाजांनाही समसमान संधी आहे. येथील खेळपट्ट्या चांगल्या व मैदानही शानदार आहे. त्याचा लाभ गोलंदाज कसे उचलतात यावर सारे काही अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही खेळपट्टीबाबत सध्या कोणताही विचार केलेला नाही, असेही क्लार्क म्हणाला. येथील खेळपट्टीवर पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने १४० ते १५० धावा केल्या तर त्या आव्हानात्मक ठरेल, असेही तो म्हणाला. आपल्या संघाच्या सध्या कामगिरीवरही कर्णधार क्लार्कने समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही सामन्यात आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सहा फलंदाज गमावल्यानंतरही आम्ही सामन्यावर पकड मजबूत करून विजय मिळविला, असेही त्याने यावेळी आवर्जून सांगितले.
प्रवीण कुमार मायदेशी परतणार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याआधी भारताला एक जबर धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्या सेवेला आता भारताला मुकावे लागणार आहे. पोटातील स्नायू दुखावल्यामुळे प्रवीण कुमारला मायदेशी परतावे लागणार आहे.
सरावादरम्यान प्रवीणला त्रास जाणवू लागल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला एमआरआयसाठी पाठविले असता त्याच्या पोटातील स्नायू दुखावला गेला असल्याचे आढळून आल्यामुळे त्याला मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक साखळी फेरीचे अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन्ही सामने खेळणार प्रवीण कुमार आजच मायदेशी रवाना झाला. प्रवीणच्या जागी अन्य एका वेगवान गोलंदाजाची घोषणा बीसीसीआयतर्फे लवकरच केली जाणार आहे.
आजचे सामने
सुपर ८ फेरी)
भारत वि. ऑस्ट्रेलिया
वेळ : सायं. ७ वाजता
स्थळ : केंसिंग्टन ओवल, बार्बाडोस
वेस्ट इंडीज वि. श्रीलंका
वेळ : रात्री ११ वाजता
स्थळ : केंसिंग्टन ओवल, बार्बाडोस
Friday, 7 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment