Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 4 May 2010

कसाब दोषी, ८६ आरोप सिद्ध

मुंबई, दि. ३ - २६ / ११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाबला आज विशेष कोर्टाने दोषी ठरवले. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, या अत्यंत गंभीर आरोपासह कसाबवर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व ८६ आरोप विशेष न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांनी मान्य केले आहेत. आता कसाबला काय शिक्षा द्यायची, याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे.
दुसरीकडे, याच खटल्यातील अन्य दोन संशयित फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेखला विशेष कोर्टाने निर्दोष ठरवले आहे. अबू इस्माईलकडे मिळालेला मुंबईचा नकाशा फहीम अन्सारीने दिल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होऊ शकत नाही, असे न्या. ताहिलियानी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या दोघांवर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना लगेचच मुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुंबई दहशतवादी हल्ला खटल्याचा निकाल काय लागणार ? कसाबला फाशी होणार का? याकडे आज सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ निष्पाप देशी-परदेशी नागरिकांना आणि सर्व शहीद अधिकारी-जवानांना न्याय मिळावा, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. विशेष कोर्टाने कसाबला दोषी ठरवल्याने ती अर्धी पूर्ण झाली आहे. भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचणे, कटाच्या पूर्ततेसाठी एके-४७, ग्रेनेड, पिस्तूल, आरडीएक्स आदी शस्त्रे जमवणे, भारतीय आणि परदेशी नागरिकांचा हेतुपूर्वक आणि निर्घृण खून करणे, त्यांना गंभीर जखमी करणे, खासगी आणि सरकारी मालमत्तेची हानी करणे, हत्यारांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देणे, परवाना नसताना बेछूट गोळीबार करणे, स्फोट घडवून आणणे, असे एकूण ८६ आरोप न्या. ताहिलियानी यांनी मान्य केले आणि कसाबच्या शिक्षेची सुनावणी उद्या सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
वर्षभर चाललेल्या या खटल्यातील सर्व साक्षी-पुरावे लक्षात घेऊन १५२२ पानांचे निकालपत्र न्या. एम. एल. ताहिलियानी यांनी तयार केले आहे. त्याचे वाचन आज दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी सुरू झाले आणि कसाबवरच्या एकेका आरोपावर न्यायमूर्ती महोदयांनी आपली मते नोंदवली. देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपावर त्यांनी सर्वांत जास्त वेळ भाष्य केले. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेली साक्षही या निकालपत्रात ग्राह्य धरण्यात आली आहे.
तुकाराम ओंबळे, अंबादास पवार या पोलिस कर्मचाऱ्यांसह सात जणांच्या हत्येचा कसाबवरचा आरोप विशेष कोर्टाने मान्य केला आहे. तसेच, ताज आणि ओबेरॉय हॉटेलमधल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या खटल्यात ३५ संशयित आरोपी "वॉंटेड' असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले होते. परंतु, २० आरोपी "वॉंटेड' असल्याचं कोर्टाने मान्य केले आहे. त्यात झकीऊर रेहमान लख्वी, हाफीझ सईद, अबू हमजा यांची नावे आहेत.
आज कसाबला दोषी ठरवल्यानंतर आता उद्यापासून कसाबच्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद सुरू होणार आहे. खरे तर त्याला कसाबच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. एक दिवस आणखी देण्याची विनंती त्यांनी केली होती, परंतु ती फेटाळून लावण्यात आली.

फहीम, सबाउद्दीन निर्दोष
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला मुंबईचे नकाशे पुरवून हल्ल्यात मदत केल्याचा आरोप फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख या दोघा भारतीयांवर होता. नेपाळला जाऊन फहीमने हे नकाशे दहशतवाद्यांना दिले होते, असा पोलिसांचा दावा होता. त्यावेळी फहीमला पाहणाऱ्या नुरूद्दीनला साक्षीदार म्हणूनही कोर्टात सादर करण्यात आले होते. परंतु, फहीम नेपाळला गेल्याचा कुठलाही पुरावा सरकारी पक्ष देऊ शकलेला नाही, असे स्पष्ट करत न्या. ताहिलियानी यांनी फहीम आणि सबाउद्दीनला निर्दोष मुक्त केले. मुंबईची माहिती आणि नकाशे इंटरनेटवर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, त्यामुळे अबू इस्माईलकडे मिळालेला नकाशा फहीमने दिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

कसाबची मान खालीच!
या संपूर्ण खटल्यात आपल्या विक्षिप्तपणाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारा कसाब आज पूर्ण वेळ खाली मान घालून बसला होता. कधी छद्मीपणे हसणारा, कधी रडणारा, कधी निकम यांच्याकडे पाहून हातवारे करणारा कसाब आज कशी प्रतिक्रिया देतो, याबद्दल कोर्टात सगळ्यांनाच कुतूहल होते. परंतु, निकालपत्राचे वाचन सुरू असताना आणि दोषी ठरवल्यानंतरही कसाब जमिनीकडे एकटक नजर लावून बसला होता. त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही.

देशाच्या इतिहासातील सर्वांत वेगवान सुनावणी झालेल्या या खटल्याचे कामकाज ८ मे २००९ रोजी सुरू झाले होते. यासाठी ऑर्थर रोड जेलमध्ये खास न्यायालय बनविण्यात आले होते. २७१ दिवस चाललेल्या कारवाई दरम्यान ६५८ जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तर ३,१९२ पानांचे पुरावे सादर करण्यात आले होते. दरम्यान, निकाल सुनावणी पूर्वी खटल्याचे कामकाज सुरू असलेल्या ऑर्थर रोड न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तुरुंगाकडे जात असलेल्या साने गुरूजी मार्गावर अनेक ठिकाणी पोलीस चौक्या बनविण्यात आल्या असून या भागातील चार कि.मी परिसरात कमांडो गस्त सुरू होती.
"फहीम व सबाउद्दीनबाबत
निकालाला आव्हान देणार'

मुंबई, दि. ३ - मुंबई हल्ल्याच्या कटातून फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्याने मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, फहीम व सबाउद्दीनबाबत दिलेल्या निकालाला वरच्या कोर्टात आव्हान दिले जाईल, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
अन्सारी आणि सबाउद्दीन हे दोघेही कुख्यात दहशतवादी आहेत. ते लष्कर ए तोयबाचे सक्रिय सदस्य आहेत. ते स्लिपर सेलचे घटक नाहीत, असे सांगून त्यांच्याविरोधात सरकार या निकालाला आव्हान देईल, असे त्यांनी जाहीर केले.
फहीम आणि सबाउद्दीन हे मुंबई हल्ल्याच्या कटात गुंतलेले केवळ दोन भारतीय होते. अन्सारीने या हल्ल्यासाठी नकाशे बनविले आणि नेपाळमध्ये ते सबाउद्दीनकडे सोपविले. पुढे सबाउद्दीनने ते लष्कर ए तोयबाकडे पाठविले असे त्यांच्यावर आरोप होते.
हे आरोप सिद्ध होण्यासाठी सरकारी पक्ष नुरूद्दीन या एकमेव साक्षीदारावर विसंबून राहिला. अन्सारीने सबाउद्दीनकडे नकाशे सोपविले, त्यास नुरूद्दीन हा साक्षीदार होता. त्यातला एक नकाशा कसाबच्या बरोबर असलेल्या आणि गिरगाव चौपाटीवर चकमकीत मरण पावलेल्या अबू इस्माईल या दहशतवाद्याच्या खिशात सापडल्याचा सरकारी पक्षाचा दावा होता.
नुरूद्दीन नेपाळला गेल्याचा कोणताही पुरावा न्यायालयाला आढळला नाही. तसेच हा नकाशा इस्माईलच्या खिशात असता तर त्याला माती लागली पाहिजे होती वा त्यावर रक्ताचे डाग पडायला हवे होते, असा बचाव पक्षाचा दावा होता. न्यायालयाने तो मान्य केला.

No comments: