Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 7 May 2010

सीबीआयच्या गैरवापराविरोधात भाजपचे १२ पासून आंदोलन

संपुआच्या 'ब्लॅकमेलिंग'चा तीव्र निषेध
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारकडून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना व विशेष करून भाजपचे सरकार असलेल्या राज्यांना सतावण्याचा प्रकार सुरू आहे. "सीबीआय' चौकशीत अडकलेल्या कॉंग्रेस नेत्यांना निर्दोष ठरवून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कुरघोडी करण्याच्या प्रकाराचा भाजप तीव्र निषेध करीत आहे, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले. येत्या १२ रोजी भाजपतर्फे देशव्यापी आंदोलन छेडले जाईल व प्रत्येक राज्यातील "सीबीआय' कार्यालयाबाहेर निदर्शने केली जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच गोवा भेटीवर आलेल्या नितीन गडकरी यांनी आज सर्वप्रथम मिरामार येथील गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी गोव्यातील पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी प्रदेश भाजपाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, उपाध्यक्ष प्रकाश वेळीप व भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांची उपस्थिती होती.
कॉंग्रेसकडून विरोधकांचे राजकीय "ब्लॅकमेलिंग' सुरू आहे व त्यासाठी "सीबीआय' यंत्रणेचा सर्रासपणे वापर होत आहे. या यंत्रणेची विश्वासार्हता व स्वायत्तताच मलिन करून ही यंत्रणा म्हणजे "कॉंग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन' बनवल्याचा ठपकाही श्री. गडकरी यांनी ठेवला. अलीकडेच संसदेत कपात सूचनेवरील मतदानावेळी काय घडले ते संपूर्ण देशाने पाहिले. या काळात "सीबीआय'चे शस्त्र वापरून विरोधकांना धाक दाखवण्यात आला व त्यामुळेच काही "संपुआ' विरोधकांनी सरकारला साथ दिली तर उर्वरीतांना मतदानावरच बहिष्कार टाकला. भाजप वगळता इतर पक्षांत "सीबीआय'शी दोन हात करण्याचे धाडस नाही, त्यामुळे हा लढा भाजपकडूनच उभारला जाणार आहे. गुजरातेत भाजपला सत्तेवर आणल्याने या राज्याची सतावणूकच कॉंग्रेसने आरंभिली आहे. विकास व प्रगतीच्या दिशेने आघाडीवर असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा कुटील डावच खेळला जात आहे. सोहराबुद्दीन प्रकरणी गुजरात पोलिसांच्या मागे "सीबीआय'चा ससेमिराच सुरू आहे. गुजरात पोलिसांनी दहशतवाद्यांना घातलेल्या कंठस्नानाचा वापर करून खोट्या एन्काऊंटरच्या नावाखाली गुजरात पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा विडाच कॉंग्रेसने उचलल्याची टीका श्री. गडकरी यांनी केली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व इतर मंत्र्यांनी या सर्व घाणेरड्या राजनीतीबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. अजित जोगी, "बोफोर्स' घोटाळा प्रकरण, सज्जन कुमार, जगदीश टायटलर आदी कॉंग्रेस नेत्यांच्या चौकशीबाबत "सीबीआय'च्या धोरणावर खुद्द न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. कॉंग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे "सीबीआय'चे भूत सोडण्याचेही प्रकार घडले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव, अमरसिंग, लालू यादव, मुलायमसिंग आदी नेत्यांविरोधातही "सीबीआय'चा वापर करून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची टीकाही श्री. गडकरी यांनी केली.
प्रगती व विकासाभिमुख राजकारण
भाजपचे राजकारण कोणताही धर्म, पंथ, भाषा, प्रांत आदींवर अवलंबून नाही तर हा पक्ष राष्ट्रप्रेमाला महत्त्व देतो. देशाची प्रगती व विकास हाच पक्षाच्या राजनीतीचा मंत्र आहे. दहशतवाद किंवा गुन्हेगारीचा संबंध कोणत्याही धर्माशी लावला जाणे भाजपला मान्य नाही. प्रगती व विकासाच्या बाबतीत कोणताही मतभेद होता कामा नये, अशी पक्षाची धारणा असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्षाने निवडणुकीसाठी नवी व्यूहरचना आखली आहे. एकूण मतांमध्ये १० टक्के वाढ व्हावी यासाठी निश्चित कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक तसेच बुद्धिवादी व व्यावसायिकांना या पक्षाकडे आकर्षित केले जाणार आहे. देशातील असंघटित कामगार व श्रमिक वर्गालाही पक्षाकडे जोडले जाणार आहे. कॉंग्रेसकडून अल्पसंख्याकांच्या मनात भाजपच्या विरोधात विष पेरण्याचे काम सातत्याने सुरू आहे, यासाठी अल्पसंख्याकाशी संवाद साधला जाईल. संवादाच्या साहाय्याने गैरसमज दूर होणे शक्य असल्याचा अनुभव आपल्याला आल्याचेही त्यांनी मान्य केले. येत्या काळात पाच हजार अल्पसंख्याकाचे अधिवेशन बोलावून भाजपबाबत त्यांच्या मनात असलेले सर्व पूर्वग्रहदूषित समज दूर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी करण्याचा भाजपचा अजेंडा नाही तर पक्षाचा कार्यकर्ता देशभक्तीने प्रेरित असावा व समाजकार्यातही त्याचा सक्रिय सहभाग असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रबोधन व प्रशिक्षणावर भर
भाजपच्या विचार मंचातर्फे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आदींसाठी प्रबोधन व प्रशिक्षणाचा निश्चित कार्यक्रम आखला आहे, त्यासाठीचा अभ्यासक्रमही तयार केला आहे. प्रथमा, द्वितीया व तृतीया अशा तीन भागांत या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध अशा २७ विषयांची रचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी राबवला जाईल. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांचा पक्षातर्फे सत्कारही केला जाईल, असेही श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले.

No comments: