Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 23 February 2010

पर्रीकरांनी महासचिवपद नाकारले, एखाद्या राज्याचे प्रभारीपद स्वीकारणार

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्याचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा प्रस्ताव सविनय नाकारल्यानंतर पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी, निदान एखाद्या राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांना विनंती केली आहे. पर्रीकरांनीही ही विनंती मान्य केली असून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होताच त्यांची एखाद्या राज्याच्या प्रभारीपदी निवड केली जाणार आहे.
गोव्याचे प्रदेश भाजपध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीच "गोवादूत'शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणावर एखाद्या महत्त्वाच्या पदी नियुक्ती केली जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. तथापि, यापूर्वी अनेकदा विविध राष्ट्रीय पदांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर परवा इंदूरच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी गोव्याच्या प्रतिनिधी मंडळासमोरच पर्रीकरांना पुन्हा एकदा महासचिव होण्याची गळ घातली. "तुमचे नाव माझ्या टीममध्ये घालण्यात आले आहे', असे गडकरींनी सांगताच, "कृपया राग मानू नका, कौटुंबिक आणि गोवा भाजप या दोन कारणांमुळे तूर्त आपण ही जबाबदारी पेलू शकणार नाही', असे पर्रीकरांनी विनम्रपणे सांगून त्यांचा प्रस्ताव नाकारला. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या आयुष्यातला हा मोठा त्याग असून या घटनेने पर्रीकरांबद्दलचा आपल्या मनातला आदर अधिकच वाढला असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
गोव्याच्या राज्य कार्यकारिणीचा घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल; परंतु तत्पूर्वी दक्षिण गोवा जिल्हा समितीची घोषणा पुढील एक दोन दिवसात केली जाईल असे त्यांनी सांगितले. महागाई व राष्ट्रीय सुरक्षा हे विषय हाताळण्यास केंद्रातील "युपीए' सरकारला आलेल्या अपयशाबद्दल केंद्राचा निषेध करण्यासाठी देसभरातून सुमारे दहा कोटी सह्या गोळा केल्या जाणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यासह देशभरात हे काम सुरू होणार असल्याचेही प्रा. पार्सेकर यांनी सांगितले.

No comments: