मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): संगीताचे शिक्षण आत्मसात करण्यासाठी गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांनी अपार कष्ट सोसून संगीतसाधना केली आणि गोव्याला शास्त्राय संगीताची अद्भुत देणगी दिली. त्यांचाच संपन्न वारसा आज त्यांची कन्या किशोरी आमोणकर पुढे चालवत आहेत. स्वरमंच संस्था गेली नऊ वर्षे या महान गायिकेच्या नावाने खास संगीत संमेलन आयोजित करत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन फातोर्ड्याचे आमदार तथा संमेलनाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आज येथे केले.
रवींद्र भवनाच्या परिषदगृहात "स्वरमंच मडगाव', कला व संस्कृती खाते आणि उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते व्हायचे होते; पण ते अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारूलकर यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ झाला.
अलका मारूलकर व आमदार दामू नाईक यांनी समई प्रज्वलित करून आणि स्व. मोगूबाई कुर्डीकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून उद्घाटन केले. त्यावेळी संमेलनाच्या प्रसिद्धी माध्यम दै. "गोवादूत'चे विपणन व्यवस्थापक सागर अग्नी, सरव्यवस्थापक ज्योती धोंड, अध्यक्ष किरण नायक, डॉ. श्रीपाद वाघुर्मेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वरमंच संस्था ४६ वर्षांपूर्वी स्थापन झाली होती. संगीताची परंपरा पुढे नेण्यासाठी ती प्रयत्नत आहे. संस्थेचे निष्ठेने कार्य करत आहेत सांगून दामोदर नाईक म्हणाले, "स्वरमंच' संस्थेची स्वतःची वास्तू असावी अशी इच्छा असून ती उभारून तिचे संगीत अकादमीत रूपांतर करण्याची मनीषा आहे. ती स्तुत्य असून त्यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीन.
या संमेलनासाठी ग्रामीण भागांतील संगीताचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वाहनाची व जेवणाची व्यवस्था संस्थेने केल्याबद्दल श्री. नाईक यांनी संस्थेचे अभिनंदन केले. ही व्यवस्था करणारी एकमेव संस्था आहे.
आपला कित्येक वर्षांपासून स्वरमंच संस्थेशी जवळचा संबंध आहे. या संस्थेचे संस्थापक माधव पंडित यांच्यामुळे संस्थेशी आपला संबंध आला, असे डॉ. अलका मारूलकर यांनी सांगितले.
आपल्या वडिलांबद्दल मोगुबाईना अत्यंत प्रेम होते. आजारपणातही मी भेटायला गेले तेव्हा वडिलाच्या प्रकृतीबद्दल व माझ्या गायनाबद्दल त्यांनी सर्वप्रथम विचारले होते, अशी आठवण अलकाताईंनी सांगितली.
ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संस्थेचे अध्यक्ष किरण नायक यांनी स्वागत करून संस्थेची माहिती दिली "गोवादूत' नेहमीच प्रसिद्धीमाध्यम राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ही संस्था गोव्यातील अत्यंत जुनी संस्था आहे. गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून यंदा निवास १०० टक्के लागला. ५ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. देव कुटुंबांनी या संस्थेचे कार्य बघून तीन विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्या देण्यास कायम ठेव दिली आहे.
यावर्षी सदर शिष्यवृत्या संजना देसाई, शानवी कुंकळ्येकर व ऐश्र्वर्या शानभाग यांना देण्यात आल्या. संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी आभार मानले. गिरीश वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर गोव्याचे योगराज बोरकर यांचे सितारवादन पार पडले. तसेच श्रुती आरती ठाकूर व पं. एम. व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
Sunday, 21 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment