Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 February 2010

सरपोतदार यांचे निधन

मुंबई, दि. २० : मुलुखमैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांचे आज (शनिवारी) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेवर शोककळा पसरली आहे.
सकाळपासून त्यांची प्रकृती खालावू लागली, उपचारांना प्रतिसाद देणे कमी-कमी होत गेले आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
बुधवारी सकाळी छातीत दुखू लागल्यानं सरपोतदार यांना "हिंदुजा'च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा दिसली, पण ती तात्पुरतीच ठरली. अनेक जाहीर सभांमध्ये आणि संसद-विधिमंडळात कधीच माघार न घेणारे सरपोतदार मृत्युशी झुंज देण्यात अपयशी ठरले. त्यांच्यावर उद्या, (रविवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार आणि सून शिल्पा सरपोतदार असा परिवार आहे.
शिवसेनेला मध्यमवर्गीय पांढरपेशा शिक्षित वर्गाची संघटना, अशी प्रतिमा देण्यामध्ये मधुकर सरपोतदार यांचा मोठा वाटा होता. स्वतः एका आंतराराष्ट्रीय कंपनीत पर्सनल मॅनेजर असल्यामुळे कामगार कायद्याचे उत्तम ज्ञान त्यांना होता. त्याचाच फायदा शिवसेनेला झाला. विविध कारखान्यांमध्ये शिवसेनेने युनियन स्थापन केल्या. त्यासाठी सरपोतदारांनी अथक परिश्रम घेतले. याशिवाय, रिक्षाचालक संघटनांसारख्या संघटना स्थापन करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. दादर, शिवाजी पार्क, पार्ले, ठाणे, मुलुंड या मध्यमवर्गीय विभागात शिवसेना पोहोचवण्यात सरपोतदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

मुंबईतल्या खेरवाडी मतदारसंघातून १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सरपोतदार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ आणि ९८ मध्ये त्यांनी वायव्य लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले असूनही ते मंत्रिपद मिळवण्यात कमनशिबीच ठरले होते. शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आली, तेव्हा मुंबईतून किती मंत्री करायचे, या गणितात त्यांचं नाव मागे पडलं. रालोआच्या काळात ते खासदार होते, पण त्यावेळीही मंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचं नाव नव्हतंच.

एक अत्यंत कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक अशी त्यांची ख्याती होती. ९२-९३ च्या दंगलीच्या काळात सरपोतदारांच्या गाडीत शस्त्रं सापडली होती. त्याबद्दल दोषी ठरवून त्यांना एक वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

गेली काही वर्षं ते किडनीच्या विकाराने आजारीच होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून त्यांना दूर जावं लागलं. त्यातच, अतुल आणि शिल्पा सरपोतदार यांनी मनसेत प्रवेश केल्यानं त्यांचं स्थान आणखीच डळमळीत झालं होतं. असं असलं तरी, शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात मधुकर सरपोतदार हे नाव येईलच येईल.

मधुकर सरपोतदार यांच्या निधनाबद्दल शिवसेना नेते आणि अन्य पक्षातल्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केलंय. एक कट्टर, निष्ठावान शिवसैनिक हरवल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

No comments: