पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): हणजूण भागात अंमलीपदार्थ व्यवसायात सक्रिय असलेला इस्रायली "माफिया' डेव्हिड ऊर्फ "दुदू' याला काल रात्री अंमलीपदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. "दुदू' याला अटक केल्याने अंमलीपदार्थाच्या व्यवसायात खळबळ माजली असून अनेक "पॅडलर' भूमिगत झाले आहेत. "दुदू'च्या अटकेने पोलिसांच्या हाती मोठे यश लागले असून गेल्या १२ वर्षांत त्याला अटक करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. पोलिसांच्या आशीर्वादानेच तो या व्यवसायात गब्बर झाला होता. इतकेच नव्हे तर काही पोलिस अधिकाऱ्यांसाठी दुदू म्हणजे एक "एटीएम मशीन' असल्याचेही चौकशीत स्पष्ट होत आहे. आपला काळा धंदा लवण्यात तो "दुदू डिव्हीजन इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमीडेट' या नावाने कंपनी चालवत असल्याचे भासवत होता, अशी माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक (आयपीएस) वेणू बंसल यांनी दिली.
डोक्याने हुशार आणि पैशांनी गब्बर असलेल्या या "ड्रग्ज माफिया'ला अटक करण्यासाठी गेल्या एका महिन्यापासून सापळा रचण्यात आला होता. काल रात्री पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले. छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे सुमारे ३ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा अमली पदार्थ आढळला असून तो जप्त करण्यात आला. त्याच्याकडे १४४ एक्स्टसी गोळ्या, ५ ग्रॅम हेरॉईन पावडर, ६.५ ग्रॅम कोकेन, ७.३० ग्रॅम एलएसडी, १.१६५ ग्रॅम चरस आढळून आल्याची माहिती पोलिस अधीक्षक वेणू बंसल यांनी दिली. तर, जीए ०२ एस ६४९२ क्रमांकाची सॅंट्रो गाडी आणि पाच हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार गेल्या महिन्यात हणजूण भागातील "ड्रग्ज पॅडलर' सदानंद ऊर्फ भूमी चिमुलकर याला या पथकाने अटक केली होती. अंमलीपदार्थ दुदू याच्याकडून पुरवला जात असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. काल मध्यरात्री ३.३५ वाजता सेंट अँथनी चॅपेल पेरीसवाडा हणजूण येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी दुदू याला २००८ साली मुंबई पोलिसांच्या "एटीएस'च्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात घेतले होते.
दुदू याने हणजूण येथे एक मोठे घर घेतले असून त्याठिकाणी अनेक ड्रग्ज पार्ट्यांचेही आयोजन केले जात होते. यात देशी तसेच विदेशी तरुणींचा भरणा असायचा. तसेच अनेक बडे उद्योजक आणि तरुण मंडळी यात पार्टीत सहभागी होत असे, असे पोलिसांना आढळून आले आहे. गेल्या १४ फेब्रुवारी रोजी "दुदू' याने याच घरात "व्हॅलेंटाइन डे' पार्टीचे आयोजन केले होते. त्यात अनेक मंडळी सहभागी झाली होती, अशीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. "दुदू'हा आपल्या हाताने कधीही अमली पदार्थ देत नव्हता तसेच स्वतःकडे बाळगतही नव्हती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली, असे सूत्रांनी सांगितले. पोलिस आपल्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचत असल्याची ठोस माहिती त्याला मिळाल्यानेच तो त्याच्याकडे असलेला अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी आला असता त्याला पोलिसांनी आपल्या जाळ्यात घेतले.
सदर छापा अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बंसल याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल, उपनिरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई महादेव नाईक, महाबळेश्वर सावंत, नागेश पार्सेकर, समीर वारखंडेकर व इरमय्या गुरय्या यांनी हा टाकला.
------------------------------------------------------------------
ड्रग्ज माफिया दुदू
कोणाच्या आशीर्वादाने "दुदू' गोव्यात होता...
२००६ साली दुदूच्या व्हिसाची मुदत संपल्याने त्याला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याने याविरोधात दाद मागून न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यानंतर, २००६ साली त्याला पुन्हा भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले. यावेळी त्याने व्यावसायिक व्हिसा घेऊन आपण कंपनी चालवत असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अधिक माहितीनुसार या कंपनीचा नफा केवळ ३२ हजार रुपये असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडे आहे. सदर दुदू राहत असलेले घर कोणाच्या नावावर आहे, याचा शोध सुरू आहे.
Tuesday, 23 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment