पणजी, दि. २५ (प्रीतेश देसाई): अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एका वर्षापूर्वी छापा टाकून जप्त केलेले "कोकेन' वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत चक्क "युरिया' (खत) निघाले आहे तर, "हेरॉईन' हे "पेरासिटामॉल' गोळ्यांची पावडर असल्याचे सिद्ध झाले आहे. जप्त करण्यात आलेले पदार्थ "ड्रग' नाही तर मग अंमलीपदार्थ विरोधी पथकाने रीतसर पंचनामा करून छाप्यात जप्त केलेले ते अंमलीपदार्थ गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला असून वरिष्ठ पोलिस अधिकारीही या प्रकाराने अवाक झाले आहे. या दोन प्रकरणांत जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थ चाचणीचा अहवाल नुकताच आला असून या अहवालामुळे अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पितळ उघडे पडले आहे.
या पथकाची गोपनीय कागदपत्रे ड्रग माफियांच्या घरात सापडण्याचा प्रकार उजेडात आलेला असतानाच दोन वेगळ्या प्रकरणात दोघा संशयितांकडे ड्रग मिळाल्याचा दावा करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला पदार्थ "ड्रग' नसून भलतेच काही असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे दोन्ही संशयितांना नाहक या प्रकरणात गोवण्याचा प्रकार झालेला नाही ना, अशी शक्यता खुद्द वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही प्रकरणात दोन्ही संशयितांनी एक वर्ष तुरुंगवासही भोगलेला आहे. गेल्या वर्षी अंमलीपदार्थविरोधी पथकाने कालिदास शेट्ये या पोलिस हवालदाराला अटक करून त्याच्याकडून "कोकेन' जप्त केले होते. या प्रकरणात त्याला त्वरित निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीनंतर त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, दुसऱ्या प्रकरणात राजस्थान येथील एका व्यावसायिकाच्या पुत्राकडून "हेरॉईन' जप्त करून त्यालाही अटक करण्यात आली होती. परंतु, तब्बल एका वर्षानंतर आलेल्या त्या "ड्रग' चाचणीच्या अहवालात ते "हेरॉईन' नसून तो पेरासिटामॉलच्या गोळ्यांची पावडर असल्याचे उघड झाले आहे.
जप्त करण्यात आलेले पदार्थ ड्रग नव्हते तर मग ते जप्त का करण्यात आले आणि जर ते खरोखरच ड्रग होते तर ते कुठे गेले, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कालिदास शेट्ये याच्यावर एका वर्षापूर्वी अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षकानेच छापा टाकून त्याला अटक केली होती. त्यावेळी त्यांनी पंचनामा करून सदर पदार्थ व्यवस्थित "पॅकिंग' करून चाचणीसाठी पाठवला होता. कोणत्याही प्रकरणात अंमलीपदार्थ सापडल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडे असलेले "ड्रग कीट' वापरून केली जाते. यावेळी ते "कोकेन' नसून "युरिया' असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या ड्रगची परस्पर विक्री करून त्यात कोणी "युरिया' भरले नसेल ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. "हेरॉईन'च्या बाबतीत ही ते झालेले असून हा प्रकरणात पंचनामा एका उपनिरीक्षकाने केला होता, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांची गेल्या काही महिन्यापूर्वीच अंमलीपदार्थविरोधी पथकातून बदली करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Friday, 26 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment