पुणे, दि. २१ : १३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींपैकी आणखी दोन जण दगावल्याने यातील बळीसंख्या १५ वर पोहोेचली आहे.
२४ वर्षी विकास तुलसियानी आणि २३ वर्षीय राजीव अग्रवाल हे दोघे जखमी अवस्थेत जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. तब्बल आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या दोघांची प्राणज्योत मालवली. त्यापैकी विकास हा पुण्याचाच होता. आज सकाळी जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. राजीव हा काल रात्री उशिरा दगावला.
राजीव अग्रवाल हा कोलकात्याचा रहिवासी होता. तो पुण्यातील सिंबॉयसिस महाविद्यालयात विधी शाखेत शिकत होता. स्फोट झाला तेव्हा राजीव हा त्याच्या चार मित्रांसमवेत जर्मन बेकरीत होता. स्फोटात सर्वजण जखमी झाले होते. त्यातील अभिषेक सक्सेनाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अन्य मित्रांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
राजीवला कार्पोरेट लॉमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटात ९ जण जागीच मृत्युमुखी पडले, ५ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्याप जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या जखमा खोलवर असल्याने प्रकृती सुधारण्यास काही अवधी लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
Monday, 22 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment