Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 25 February 2010

डुडूच्या घरात अटकेच्या आदेशाची प्रत

पणजी, दि. २४ (प्रीतेश देसाई): इस्रायली ड्रग माफिया "डुडू' याच्या घराच्या घेतलेल्या झडतीत अंमलीपदार्थ विरोधी पथकाची गोपनीय कागदपत्रे सापडल्याने पोलिस मुख्यालयात खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी "डुडू' याला अटक करण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशाची एक प्रत त्याच्याच घरी सापडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "डुडू'ला अटक करण्यासाठी एक आदेश अंमलीपदार्थ विभागाकडे पाठवला होता. त्या आदेशाची फाईल अत्यंत गोपनीय होती, तसा शेराही त्याच्यावर मारण्यात आला होता. तरीही त्या आदेशाची एक प्रत "डुडू' याच्या हणजूण येथील बंगल्यात सापडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहे. या प्रकारामुळे त्याचे पोलिस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे आणि त्याला पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याचे उघड झाले आहे. ही प्रत त्याला कोणी आणि कशी दिली, याची चौकशी पोलिस खात्याने सुरू केली आहे. हे गोपनीय दस्तावेज "डुडू'कडे सापडल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही पोलिस अधिकारी कचाट्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दहा वर्षांत "डुडू' याला कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने हात लावण्याचे धाडस केले नव्हते. उलट त्याला संरक्षण देऊन त्याच्याकडून लाखोंची "माया' जमवण्यात आल्याचेही तपासात उघड होत आहे. "डुडू' म्हणजे काही अधिकाऱ्याचे "एटीएम मशीन'च बनले होते. कधीही जा आणि लाखो रुपये उचलून घेऊन या. त्या सर्व अधिकाऱ्यांची नावे त्याने आता उघड करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, एका डायरीसह काही बड्या व्यक्तींची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. हे बडे उद्योजक त्याचे ग्राहक होते, अनेक वेळा ते "डुडू'कडून अंमलीपदार्थाची खरेदी करीत होते. मात्र, तो वापरत असलेला मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, अशी माहिती पथकाचे अधीक्षक वेणू बंसल यांनी दिली.
तस्करीसाठी "कुरिअर'चा वापर?
"डुडू' हा अंमलीपदार्थाची तस्करी करण्यासाठी "कुरिअर' कंपनीचा वापर करीत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याला कोठून "कुरिअर' येत होते आणि तो कुठे "कुरिअर' करीत होता याचा तपास लावला जात आहे. "डुडू' याची उझबेकिस्तान येथील प्रेयसी असून तिच्या नावेही त्याने अनेक वेळा कुरिअर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
"डुडू'ची करोडोंची मालमत्ता!
"डुडू' याची करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत शोधाशोध करण्याचेही काम पोलिसांनी हाती घेतले आहे. मात्र ही मालमत्ता आपले मित्र, प्रेयसी तसेच अन्य व्यक्तींच्या नावे केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अंमलीपदार्थाच्या तस्करीत किंवा व्यवसायात गुंतलेल्या व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकताच त्या व्यक्तीची मालमत्ता आणि बॅंक खाती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांनी देण्यात आले आहे. "एनडीपीएस' कायदा कलम ६८नुसार त्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करता येते. या पूर्वी या कायद्याचा वापर केला जात नव्हता, असे श्री. बंसल यांनी सांगितले. याच कायद्याच्या आधारे "डुडू' याची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेला सदानंद ऊर्फ भूमी चिमुलकर याची सावंतवाडी ते काणकोण पर्यंतची करोडो रुपयांची मालमत्ता आणि बॅंक खाती जप्त करण्यात आली असल्याचेही श्री. बंसल यांनी सांगितले. "भूमी' हा "डुडू' याच्याकडून अंमलीपदार्थ घेऊन व्यवसाय करीत होता, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, "डुडू'च्या कंपनीचा संचालक तथा बंगल्याचा खरा मालक सागर हाडेलकर याची आज चौकशी करण्यात आली असून त्याच्याकडून कोणतीही अधिक माहिती हाती लागलेली नाही. मात्र, "डुडूू' याच्या दोन कंपन्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. १९९८साली "प्युअर वाखोजा' नावाची कंपनी डुडू याने सुरू केली होती. त्यानंतर २००४साली "डुडू डिव्हीजन इंपोर्ट एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी सुरू केली होती. या कंपन्या केवळ डोळ्यांना पाणी लावण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------
'आजपर्यंत अमली पदार्थ विरोधी पथकाचे नाव बदनाम होते. पोलिसांचे मनोबल वाढवल्यास कोणत्याही माफियाला सहज अटक करणे शक्य आहे'' असे मत आज अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बंसल यांनी व्यक्त केले. "डुडू' याला पकडण्यासाठी तब्बल आठ महिने त्याच्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती, असेही त्याने सांगितले. "डुडू' याच्या एकदम जवळ असलेल्या आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती त्याच्यापर्यंत पोचवणाऱ्या "व्यक्तीं'चीच नकळत मदत या पथकाने घेतल्याने "डुडू' अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

No comments: