विदेशींची "दादागिरी'खपवून घेणार नाही
आज मोरजीची ग्रामसभा "गाजणार'
पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): मोरजीत विदेशी नागरिकांच्या वाढत्या दादागिरीचा बळी ठरलेल्या मरडीवाडा येथील रोहिदास शेटगावकर या स्थानिक टॅक्सीचालकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर भीषण संकट ओढवले आहे. रोहिदास हाच या कुटुंबातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने ताबडतोब लक्ष घालावे व रोहिदासच्या कुटुंबाला अर्थसाह्य मिळवून द्यावे, अशी जोरदार मागणी "मोरजीचो एकवट' आणि मोरजी पंचायत यांनी संयुक्तरीत्या बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.
आज मोरजी विकास मंच कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच रत्नाकर शेटगावकर, मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ आबा शेटगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी मोरजीचे फादर मिनिनो वॉलीस, "मोरजीचो एकवट' संघटनेचे उपाध्यक्ष शाणू दाभोलकर, सुधीर कान्नाईक, खनिजदार लक्ष्मण शेटगावकर, सहखजिनदार बाबू ऊर्फ मच्छिंद्रनाथ शेटगावकर, सचिव मेर्लिन फर्नांडिस, भक्तदास बागकर, उल्हास मोरजे आदी हजर होते.
उद्या २१ रोजी मोरजी पंचायतीची ग्रामसभा होणार असून त्यात रोहिदास शेटगावकर याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबर मोरजी गावातील विदेशी लोकांच्या वाढत्या उपद्रवांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
विदेशींनी गोव्यात पर्यटक म्हणून यावे व पर्यटक म्हणूनच राहावे. इथे वास्तव्य करून पर्यटन व्यवसायात उतरलेल्या विदेशी नागरिकांनी आता स्थानिकांना धमकावण्याचे व त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार सुरू केल्याने हा विषय सर्वत्र नेला जाईल, अशी माहिती वसंत शेटगावकर यांनी दिली. विदेशी लोकांवर हल्ला किंवा त्यांच्याबाबतीत काही घडल्यास त्याची सर्वत्र प्रसिद्धी करून गोव्याला बदनाम केले जाते; पण विदेशींकडून जेव्हा दंगामस्ती केली जाते किंवा स्थानिकांवर हल्ला करण्यात येतो तेव्हा त्यास व्यापक प्रसिद्धी दिली जात नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. मयत रोहिदास शेटगांवकर याला तीन मुलगे आहेत. सर्वांत छोटा मुलगा अपंग आहे. रोहिदास हाच या कुटुंबाचा आधार होता, त्याच्या अकाली जाण्याने या कुटुंबावर महासंकट कोसळले आहे. मोरजी गावातर्फे रोहिदासच्या कुटुंबाला मदत करण्याचे प्रयत्न होतीलच; पण राज्य सरकारकडूनही त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी उद्या ग्रामसभेत ठराव संमत करण्याचा विचार सुरू आहे,अशी माहितीही देण्यात आली.
राष्ट्रवादीने बाऊ करू नये
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा मांद्रेच्या माजी आमदार तथा माजीमंत्री संगीता परब व त्यांच्या पक्षपदाधिकाऱ्यांनी रोहीदास शेटगांवकर प्रकरणी सरकारवर केलेली टीका व पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या बदलीची केलेली मागणी ही या प्रकरणाला राजकीय स्वार्थासाठी केलेला वापर असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या नेत्यांना रोहीदास शेटगांवकर याची एवढीच सहानुभूती होती तर त्यांनी तो बांबोळी इथे मृत्यूशी झुंज देत होता, त्यावेळी विचारपूस का केली नाही,असा सवालही उपस्थित करण्यात आला. पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत व त्यांनी या संपूर्ण प्रकरणी स्थानिकांना पूर्ण सहकार्य दिले, असा निर्वाळाही यावेळी देण्यात आला.
Sunday, 21 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment