स्फोटामुळे ५० लाखांचे नुकसान
मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी): उतोर्डा येथील केनिलवर्थ या तारांकित हॉटेलमध्ये काल मध्यरात्री मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेत स्फोट होऊन संपूर्ण हॉटेलच धुराच्या विळख्यांत सापडल्याने मोठा हलकल्लोळ माजला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नसले तरी हॉटेलात उतरलेल्या पर्यटकांना हालवावे लागले तसेच हॉटेलचे साधारण ५० लाखांचे नुकसान झाले.
मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. दलाच्या दोन गाड्या उतोर्डाकडे रवाना झाल्या; मात्र तेथे आग लागलेली नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. हॉटेलच्या तळघरात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेत स्फोट झाल्याने यंत्रणेच्या वाहिन्यांतून क्षणभरातच संपूर्ण हॉटेलात धूर पसरला व घबराट माजली.
यावेळी बहुतेक पर्यटक जेवणासाठी मोकळ्या जागी गेल्याने बचावले पण नंतर काही खोल्यांत असलेल्या लोकांना हालवावे लागले. आत कोणी अडकलेले नाही याची खातरजमा करून अग्निशामक दल परतले. वेर्णा पोलिसांशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांना त्याची काहीच माहिती नसल्याचे आढळून आले, त्याची नोंदही तेथे झालेली नाही.
हॉटेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर यंत्रणेत स्फोट कसा झाला त्याचा शोध घेतला जात आहे. पण, त्या यंत्रणेच्या वाहिनीतून धूर संपूर्ण हॉटेलात पसरल्याने प्रत्येक खोलीतील भिंती काळवंडल्या आहेत. सदर यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून एकूण आकडा ५० लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Wednesday, 24 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment