पणजी,दि. २५ (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल मनजीतसिंग एस. बाली यांना दोन कोटी रुपयांची लाच घेताना मुंबई येथील "सीबीआय' ने रंगेहाथ पकडले आहे. "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाली यांना रात्री उशिरा ही लाच घेताना अटक केली. पोस्टाच्या जागेसंबंधी व्यवहारातून त्यांनी ही लाच मागितली होती. त्यासंदर्भात लाच देणाऱ्याने "सीबीआय'शी संपर्क केल्यानंतर "सीबीआय' ने बाली यांना सापळा रचून अटक केली. बाली यांच्या घरावरही "सीबीआय'ने छापा टाकून बेहिशेबी परकीय चलनही जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदर येथे दोन हजार चौरस मीटरच्या आरक्षित भूखंडावरील २५ टक्के जमिनीवर टपाल कार्यालय उभारण्यात येणार होते. या जमिनीचा विकास एक बिल्डर करत असून, ना हरकत दाखल्यासाठी त्याने बाली यांच्याशी माजी नगरसेविका रीता शहा यांच्यामार्फत संपर्क साधला. दाखल्यावर सही करण्यासाठी बाली यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.
बाली याने बिल्डरची मध्यस्थ असलेल्या रीता शहा यांना बुधवारी संध्याकाळी कुलाबा भागातील एका आलिशान उपाहारगृहात पैसे घेऊन येण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात बिल्डरमार्फत रीता शहा यांनी "सीबीआय'शी संपर्क साधला आणि या संदर्भात तक्रार नोंदविली. "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून याच उपाहारगृहात बाली यांना अटक केली.
दरम्यान, बाली यांच्या घराची झडती घेतली असता, एका ब्रीफकेसमध्ये १०,७२२ डॉलर, ३,०५० ब्रिटिश पौंड, ३,४७० युरो मिळून एकूण ३४ लाख रुपये रोख सापडले. त्याशिवाय वेगवेगळ्या २२ बॅंकांमधील खात्यांसह पंचकुला, द्वारका, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, भोपाळ आणि गुडगाव येथे कोट्यवधी रुपयांच्या मिळकती असल्याचे उघड झाले. ग्वाल्हेरच्या एका बॅंकेत लॉकर असल्याचे उघड झाले असून, ते उघडण्यासाठी काही अधिकारी रवाना झाले आहेत. शिवाय मुंबईतील घरात परदेशी बनावटीच्या ४५ मद्याच्या बाटल्या आणि पाच लाख रुपये किमतीचे ७ लॅपटॉपही सापडले आहेत. या प्रकरणी त्याचे साथीदार असलेले हर्ष आणि अरुण दालमिया यांनाही "सीबीआय' ने अटक केली आहे.
----------------------------------------------------------------
लाचलुचपत प्रकरणात महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल मनजीतसिंग एस. बाली यांचे गोव्यातही एक घर असल्याची माहिती मिळाली असून मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक गोव्यात दाखल झाले आहे. या घराची झडती घेऊन अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे, गोव्यात त्यांची किती मालमत्ता आहे, तसेच त्यांनी आपल्या अन्य कोणत्या नातेवाइकाच्या नावावर मालमत्ता ठेवली नाही ना, याचाही तपास लावला जात आहे.
Friday, 26 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment