पर्रीकर विचारणार सरकारला जाब
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): कोडली ते पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणारी जमीन अजूनही लोकांच्या नावावर आहे. या पार्श्वभूमीवर पंचवाडी पंचायतीकडून सेझा गोवा खाण कंपनीला प्रकल्प उभारण्यास "ना हरकत' दाखला देण्याबाबत ठराव कसा काय घेतला जाऊ शकतो, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. या ठरावासाठी उत्सुक असलेल्यांचा या व्यवहारात नक्कीच काहीतरी स्वार्थ असेल, त्यात सत्ताधारी पक्षामधील काही नेत्यांचे अभय त्यांना मिळत असल्यानेच त्यांच्याकडून ही बेकायदा कृती घडत आहे, असा दावा त्यांनी केला.
पंचवाडी बचाव समितीतर्फे आज पर्वरी येथील सचिवालयात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. पंचवाडीसारख्या निसर्गदत्त गावात येऊ घातलेल्या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित बंदर प्रकल्पामुळे हा गाव नष्ट होणार अशी भीती व्यक्त करून पंचवाडीवासीयांना वाचवा, असे आवाहन समितीतर्फे पर्रीकर यांना करण्यात आले. कोडली ते कापशे या बगलमार्गाला समितीचा अजिबात विरोध नाही; पण बगलमार्गाचे निमित्त पुढे करून पंचवाडी गावच्या केंद्रस्थानी विजर खाजन येथे खनिज हाताळणी प्रकल्प उभारण्याचा डाव मात्र कपटी कारस्थान असल्याचे यावेळी समितीने पर्रीकर यांना पटवून दिले.
या प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या जमिनी जात नाहीत. हे लोक प्रत्यक्ष गावात स्थायिक नसल्याने त्यांना या प्रकल्पाच्या परिणामांशी काहीही देणेघेणे नाही. यामुळे या लोकांच्या पाठिंब्याला काहीही अर्थ नाही. पुढील पिढ्यांसाठी हा गाव सुरक्षित ठेवणे व गावातील नैसर्गिक संपत्ती त्यांच्यासाठी जपून ठेवणे ही काळाची गरज आहे. केवळ काही पैशांसाठी आपली भूमी खाण कंपनीच्या घशात घालण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे. जिवात जीव असेपर्यंत तो साध्य होऊ देणार नाही, असा निर्धारही समितीने पर्रीकर यांच्यासमोर व्यक्त केला.
पर्रीकर यांनी यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा लढा उभारून त्याविरोधात दाखवलेल्या चिकाटीची स्तुती केली. आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावरून सरकारकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचे आश्वासन त्यांनी समितीला दिले. लोकांच्या इच्छेविरोधात एकही प्रकल्प गावात उभारता कामा नये, असे सांगून पैशांच्या आमिषांना बळी न पडता पंचवाडी गावच्या रक्षणासाठी लोक एकत्रित राहिल्यास कोणीही याठिकाणी प्रकल्प उभारण्याचे धाडस करणार नाही,असेही ते म्हणाले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या जमिनीवर परस्पर प्रकल्प उभारण्यास "ना हरकत' दाखला देण्याबाबतचा ठराव पंचवाडी पंचायत कशी काय घेऊ शकते? हा ठरावच बेकायदा आहे, असेही पर्रीकर म्हणाले. अविचारी पद्धतीने अशा प्रकारे आमिषांना बळी पडून या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या लोकांचे काहीतरी हित जपले आहे. काही स्थानिक सत्ताधारी नेत्यांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे, म्हणूनच हा बेकायदा प्रकार सुरू आहे,अशी टीकाही पर्रीकर यांनी केली. या प्रसंगी समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता, दुर्गेश शिसाणे, नाझारेथ गुदिन्हो, पंच लीना डिकॉस्ता आणि पंचवाडी चर्चचे फादरही उपस्थित होते.
Tuesday, 23 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment