Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 23 February 2010

वास्कोत कामगाराचा खून, तिघांना अटक

वास्को, दि. २२ (प्रतिनिधी): हरवलेल्या "मोबाईल'वरून झालेल्या वादानंतर एल. गोपाळ नामक कामगाराचे त्याच्याच तीन साथीदारांनी अपहरण करून त्याला जबर मारहाण करून त्याचा चेहरा दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार मुरगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. अपहरणाबाबत मुरगाव पोलिसात तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर काही तासांच्या आत पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तीनही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणावर उजेड पडला.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील मूळ एल. गोपाळ (३५) हा एमपीटीमध्ये कामाला असलेला कंत्राटी कामगार आपल्या अन्य साथीदारांबरोबर सडा येथे असलेल्या कचरा प्रकल्पाच्या मागील चाळीत राहत होता. काल (दि २१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गोपाळ याचा साथीदार गणेश याचा मोबाईल गायब झाल्याचे लक्षात येताच दोघांनी संशयावरून त्यांच्यासोबत कामाला असलेल्या ख्रिस्तोफर मायकल (२९), परेश प्रजापती (३४) व किरण महाजन (३२) यांना मोबाईलबाबत विचारले. यावेळी या तिघांनी गणेश याला मारण्यास सुरुवात केली. यावेळी गोपाळने आपल्या गणेशला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी उलट गोपाळवर हल्लाबोल केला. नंतर त्याचे राहत असलेल्या चाळीतून अपहरण केले. या तिघांनी गोपाळचे अपहरण केल्याचे गणेशच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला व शेवटी गोपाळचे पर्यवेक्षक सेबिस्तियो कार्व्हालो यांनी मुरगाव पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरित कारवाई करून रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अपहरण कर्त्यांपैकी परेश प्रजापती व किरण महाजन यांना ते लपलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतले, यानंतर एका तासाच्या आत ख्रिस्तोफर मायकल सापडला. गोपाळबाबत विचारण्यास सुरवात केली असता त्यांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. संशयित ख्रिस्तोफर, परेश व किरण यांनी प्रथम गोपाळ याची जबर मारहाण करून नंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आज सकाळी मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांनी एल. गोपाळ याचा मृतदेह कचरा प्रकल्पाच्या मागे असलेल्या डोंगराळ भागातून ताब्यात घेतला. मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध भा.दं.सं. ३०२ व ३६४ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी या तीनही संशयित आरोपींना वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: