Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 February 2010

बाबूशचा बळी देऊन मंत्रिपद नकोच..!

कामत यांच्या डावपेचांना मडकईकरांचा कोलदांडा
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत फूट घालण्याचे प्रयत्न कामत व त्यांच्या मोजक्याच समर्थकांनी चालविले असून आता पांडुरंग मडकईकर यांना विरोधी गटापासून बाजूला काढण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद त्यांना देण्याचे सूतोवाच कामत गटाकडून केले जात आहे. मात्र, बाबूश यांचे मंत्रिपद काढून आपणास ते दिले जाणार असेल तर ते आपणास मान्य नसल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले आहे.
कामत यांच्याविरोधात आक्रमक बनलेल्या गटाने काहीही झाले तरी नेतृत्वबदल घडवून आणणारच, असा विडा उचलला असल्याने या गटाला कमकुवत करण्यासाठी सध्या कामत गटाकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या आणि युक्त्या लढवल्या जात आहेत. मात्र अशा युक्त्यांना बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार या गटाने केला आहे.
कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनीच सुरुवातीला कामत यांच्याविरोधात बंडाला सुरुवात केली व त्याचे पर्यवसान सध्याच्या अस्थिरतेत झाले आहे. पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काहीही कारण नसताना काढून घेण्यात आल्याने ते खूपच नाराज झाले आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याची लालूच वारंवार श्रेष्ठींकडून दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे त्यांची श्रेष्ठी थट्टा तर करीत नाही ना, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची बनली आहे.
मुख्यमंत्री कामत यांनी आता नव्याने मडकईकर यांना मंत्रिपदाचा प्रस्ताव सादर केला असून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून त्यांना देण्याचाही घाट घातला आहे. बाबूश यांना शिक्षण खाते दिल्याने सुरुवातीला अनेकांनी सरकारवर टीका केली खरी; पण शिक्षणमंत्री या नात्याने बाबूश यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे जनताही त्यांच्यावर खूष आहे. ते प्रत्यक्षात काम करीत असताना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची कृती पांडुरंग मडकईकर यांना मान्य नाही, अशी नवी माहिती मिळाली आहे.
कामत यांना मंत्रिपदाची जागाच खाली करायची असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातील सपशेल अपयशी ठरलेल्यांची खुर्ची खाली करावी,असा सल्ला श्री.मडकईकर यांनी दिल्याचे समजते. बाबूश यांचे मंत्रिपद काढून मडकईकर यांना बहाल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा बेत ही राजकीय चाल आहे. बंडखोर गटांत मतभेद निर्माण करण्याचाच हा डाव असल्याने हा प्रस्ताव धुडकावून लावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरम्यान, काल शिवजयंतीनिमित्त फर्मागुडी येथे झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री रवी नाईक हे भलतेच आक्रमक बनले होते. त्यांनी आपल्या भाषणांत तर चक्क आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. काल सकाळी नव्यानेच राजकारणात उतरलेल्या काही नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणातील रोख थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर यांच्यावर होता, अशी कुजबुज तेथे उपस्थित नागरिकांत लगेच सुरू झाली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आप्रत्यक्षरीत्या राजकारणातील नीतिमत्तेचे चार शब्द सुनावून रवी नाईक यांच्यावर शरसंधान केले असेही सांगितले जाते. एकंदरीत आतापर्यंत छुप्या पद्धतीने एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता उघडपणे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कॉंग्रेस आघाडी सरकारातील हेवेदावे अधिक तीव्रपणे जनतेसमोर येऊ लागले आहेत.

No comments: