वन खात्याकडून कारवाईचे नाटक
यंत्रसामग्री आणि ट्रक ताब्यात
पणजी, २३ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या राजवटीत राज्यामध्ये बेदरकार खाण व्यवसायाने सध्या बेसुमारीचा उच्चांक गाठला असतानाच अनेक ठिकाणी चक्क सरकारच्याच आशीर्वादाने चालणाऱ्या बेकायदा खाणींची एकाहून एक प्रकरणे आता उघड होऊ लागली आहेत. थातोडी - धारबांदोडा येथे अशाच एका मोठ्या बेकायदा खाणीतून गेल्या काही महिन्यांत हजारो टन हायग्रेड खनिज राजरोस काढले गेल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे. त्यानंतर सदर खाणीला टाळे ठोकण्यात आले असले तरी खाण आणि वन खात्याच्या आशीर्वादानेच चालणाऱ्या या खाणीवर सर्वोच्च न्यायालयाच्या बडग्याच्या भीतीपोटीच हे कारवाईचे नाटक रचले जात असल्याचे समजते.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीच्या दोन खाणी थातोडी परिसरात चालतात. त्यांपैकी एक खाण धारबांदोडा - मोले हमरस्त्याला लागून आहे; तर दुसरी आतील भागात आहे. त्यातील सील ठोकलेल्या या दुसऱ्या खाणीला जोडून राखीव वनक्षेत्र असून माल उत्खनन करता करता कंपनीने चक्क एक किलोमीटर भागातील वनक्षेत्रात घुसून मोठ्या प्रमाणात झाडांची आणि परिसराची नासधूस केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी इतक्या खोलवर जाऊन उत्खनन करण्यात आले आहे की खोलाई पाण्याच्या पातळीपर्यंत आत गेली आहे. आतील काळाकभिन्न हायग्रेड खनिज मालावर हात मारताना खाण कंपनीने कोणत्याही प्रकारचे विधिसंकेत पाळलेले नाहीत. खोदाईचा आकार, व्याप्ती आणि खोली पाहिली तर काही हजार टन माल या जागेतून काढला गेला आहे हे घटनास्थळी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवरून आणि घेतलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते.
आश्चर्याची आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे, तेथील बेकायदा खनिज उत्खनन गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होते. शेकडो ट्रक आणि अवाढव्य यंत्रे लावून माल काढला जात होता. वनाची, झाडांची कत्तल केली जात होती; परंतु स्वतः वन खाते अथवा खाण खात्याने ते रोखण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे काही कायदेशीर चालले आहे अशा थाटात गोष्टी सुरू होत्या. मात्र, चार-पाच दिवसांपूर्वी अचानकपणे "वरून' सूत्रे हालली आणि सदर खाणीवर कारवाई करण्याचे आदेश निघाले. ते करण्यापूर्वी खाण आणि वन खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी "खाल्ल्या मिठाला' जागून संबंधित खाण कंपनीला सतर्कही केले. सावध होण्याचा इशारा मिळतात एका झटक्यात ट्रक, मशीनरी आणि काम करणाऱ्या सर्वांना सदर परिसर मोकळा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पणजी, फोंडा येथून वन अधिकारी पोहोचण्यापूर्वीच जवळपास सगळा परिसरच रिकामा करण्यात आला होता. मात्र शेवटी दहा चाकांचे दोन मोठे ट्रक आणि दोन यंत्रे आत अडकली. खाण खात्याने ती ताब्यात घेतली. त्यांपैकी मोडलेले एक यंत्र अजूनही आतील भागात सील ठोकलेल्या अवस्थेत आहे. दुसरेही त्याच परिसरात आहे. तसेच ते दोन महाकाय ट्रक मात्र वन खात्याच्या धारबांदोडा येथील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचालीही सुरू असल्याचे समजते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या इतक्या बेकायदा आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या असतानाही वन किंवा खाण खात्याने अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा नोंदवला नाही की कोणालाही अटक केलेली नसल्याचे समजते. ज्याप्रमाणे आंबेली - सत्तरी येथे एका वरिष्ठ राजकारण्याने शेकडो ट्रक खनिज मालाची तस्करी करून काहीच घडले नाही अशा थाटात हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे; त्याच प्रकारे हे प्रकरणही दडपून टाकले जाण्याची दाट शक्यता आहे. धारबांदोडा, थातोडी, मोले, कुळे या भागांमध्ये सध्या सील ठोकण्यात आलेल्या या खाणीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. वन खाते किंवा सरकारचे खाण खाते या संदर्भात नेमकी कोणती कारवाई करते याकडे अनेकांचे लक्ष सध्या लागून राहिले आहे.
Wednesday, 24 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment