Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 25 February 2010

पंचवाडीवासीयांची परवड

सुनावणी एक महिना पुढे ढकलली
अतिरिक्त पंचायत संचालकांच्या निर्णयावर नाराजी

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पंचवाडीतील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्ताधारी पंचायत मंडळाने अवैधरीत्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाला दिलेल्या आव्हानाची सुनावणी आज थेट एक महिना पुढे ढकलण्यात आली. अतिरिक्त पंचायत संचालकांच्या या एकतर्फी कृतीबाबत पंचवाडी बचाव समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पंचवाडी ग्रामपंचायतीतर्फे गेल्या ७ रोजी झालेल्या ग्रामसभेत नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व बंदर प्रकल्पाला बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्ताधारी पंचायत मंडळाने अवैध पद्धतीने या प्रकल्पाला समर्थन करण्याचा ठराव संमत केला होता. या वादग्रस्त ठरावाला पंचवाडी बचाव समितीने आव्हान दिले होते. या आव्हान याचिकाप्रकरणी आज अतिरिक्त पंचायत संचालकांसमोर सुनावणी होती. यावेळी पंचवाडी बचाव समितीचे पदाधिकारी सुनावणीसाठी हजर राहिले असता पंचायतीतर्फे उपस्थित राहिलेल्या वकिलांनी पुढील तारीख मागितली व अतिरिक्त पंचायत संचालकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून न घेता ही सुनावणी थेट १ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली.
अतिरिक्त पंचायत संचालकांच्या या निर्णयामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांची मात्र बरीच निराशा झाली. राजकीय दबाव टाकूनच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचा आरोपही समितीने केला. पंचवाडी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे सतावणूक करून त्यांचा विरोध मोडून काढण्याची स्वप्ने सरकारने पाहू नयेत. समिती व पंचवाडीतील जनता हा लढा कदापि सोडणार नाही, असे सांगून पंचवाडी गाव शाबूत राहिला तरच हे ग्रामस्थ राहतील, त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत हा लढा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंचवाडीच्या या लढ्यात आता थेट राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांची सरकारी खात्यांकडून अशीच परवड होणार आहे. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा आता बदलणे भाग आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच समितीची बैठक घेतली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments: