कुळेवासीयांच्या एकजुटीचा विजय
कुळे, दि. २१ (प्रतिनिधी): येथील रेल्वे यार्डात खनिज मालाचा चढउतार करण्यास स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध असल्याने व त्याअनुषंगाने गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्यानेअखेर आज ग्रामपंचायतीने यासाठी "ना हरकत दाखला'देण्याच्या विषयालाच ग्रामसभेत बगल दिली, त्यामुळे हा या परिसरातील जनतेच्या एकजुटीचा दणदणीत विजय असल्याच्या प्रतिक्रिया गावात उमटल्या.हा ठराव चर्चेला येणार हे समजल्याने कुळे, शिगाव व या परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध करण्याचा चंगच बांधला होता, त्यासाठी आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तथापि तंग वातावरणात सभेला आरंभ होताच," स्थानिक पंचायत कायद्यानुसार खनिज मालाचा चढउतार करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत रेल्वे यार्डचे स्थलांतर आणि बगल रस्त्याची अंमलबजावणी होत नाही, तोवर हा विषय भविष्यात ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर येणार नाही. तसेच, तसा प्रयत्नही केला जाणार नाही' असे आज सरपंच संदीप देसाई यांनी ग्रामसभेत जाहीर केले. हा मुद्दा ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात यावा, यासाठी कुळे नागरिक समितीने कंबर कसली होती. तर, दै. गोवादूतने या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. शेवटच्या दोन दिवसांत शिगाव नागरिक समितीनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने अखेर आज कुळे पंचायतीने हा मुद्दा कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच. यापुढे हा विषय ग्रामसभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर आणला जाणार नसल्याचेही उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन दिले. सरपंच संदीप देसाई यांनी जनहित लक्षात घेऊन लोकशाहीची कदर राखल्याने ग्रामस्थांनी पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.
हॉस्पेट येथून खनिज माल आणून तो कुळे रेल्वे यार्डात चढउतार करण्यासाठी आज दि. २१ रविवारी खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती. परंतु, याला कोणत्याही परिस्थिती नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माल हाताळणी करायला द्यायचा नाही, निर्धाराने मोठ्या संख्येने ग्रामस्थ आज पंचायत सभागृहात उपस्थित होते. सदर विषय चर्चेस आला त्यावेळी सरपंचांनी पंचायत कायद्यानुसार खनिज मालाची चढउतार करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ शकत नसल्याचे जाहीर करून लोकांना सुखद धक्का दिला. येथील ज्येष्ठ साहित्यिक पु.शि.नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना असा ठराव ग्रामसभेत आणलाच जाऊ शकत नाही, असे सांगून जनतेने एकजूट दाखवल्यानेच पंचायतीने हा विषय टाळल्याचे म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल उपस्थित असलेल्या माजी सरपंच सौ. ऊर्मीला उमेश नाईक यांना विचारले असता त्यांनी हा महिलाशक्तीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. जेव्हा हा विषय ग्रामसभेत यायचा त्या-त्यावेळी एकजुटीने महिलावर्गाने जोरदार विरोध केला आहे. सरपंचांनी आणि इतर सदस्यांनी कायद्याचा अभ्यास करून या विषयाला कायमचा पूर्णविराम दिल्याने महिलांच्यावतीने समाधान व्यक्त केले.
अन्यायाविरुद्ध व जनहितासाठी तसेच येथील पर्यावरण व निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी झटणाऱ्या कुळे नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर व सचिव ज्योकीम डिकॉस्ता यांनी हा सांघिक लढ्याचा विजय असल्याचे सांगितले. तसेच, कुळे ग्रामस्थांनी व शिगाव नागरिक समिती व इतर मंडळांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगून यापुढे कुळे ग्रामस्थांना निरोगी जीवन जगता येणार असल्याचे मत व्यक्त केले.
१९९८ सालच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी सरपंच नरेश शिगांवकर यांनी या निर्णयाचे स्वागत करून अशा निर्णयाबाबत गाफील न राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
२००५ साली असाच निर्णय त्यावेळी पंचायत मंडळाने दिला होता. त्यानंतर सदर विषय पुन्हा पाच वर्षांनी ग्रामसभेत आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. गरज भासल्यास हा लढा असाच पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नीलेश वेळीप यांनी यापुढे ग्रामसभा अहवाल स्थानिक भाषेतून लिहिला जावा, जेणे करून सामान्य नागरिकांना तो वाचता येईल, अशी मागणी केली. पत्रकार कालिदास काणेकर यांनी ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र आणण्याची सक्ती का करण्यात आली, अशा प्रश्न यावेळी केला. या प्रश्नाला उत्तर देताना सरपंचांनी सांगितले की, यापुढे ओळखपत्र आणण्याची सक्ती कायम ठेवण्यात येईल व ते आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
सचिव दत्तू राऊत देसाई यांनी सन २०१० ते २०११ सालचे अंदाजपत्रक सादर केले. सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत नरेश शिगांवकर, संतोष मसूरकर, ज्योकीम डिकॉस्ता, कालिदास काणेकर, श्रीमती. शिला वेरेकर, सौ. ऊर्मीला नाईक, नीलेश वेळीप, दीपक वेळीप व इतर ग्रामस्थांनी भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्यात सुरुवातीला सरपंच संदीप देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून सभेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेवटी माजी सरपंच सुधाकर गावकर यांनी आभार व्यक्त केले.
Monday, 22 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment