Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 24 February 2010

मुख्यमंत्री म्हणतात, माय नेम इज 'खाण'!

भाजयुमो उत्तर गोवा उपाध्यक्ष
रुपेश हळर्णकर यांची टीका

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील कॉंग्रेस आघाडीचे नेते शाहरूख खानच्या "माय नेम इज खान' चित्रपटाला सुरक्षा देण्यात गर्क आहेत तर इकडे बेकायदा खाणींना संरक्षण देता देता स्वतः "खाण सम्राट' बनलेले कॉंग्रेस नेते "माय नेम इज खाण' अशा आविर्भावातच वावरत आहेत, अशी खरमरीत टीका भाजप युवा मोर्चाचे उत्तर गोवा उपाध्यक्ष रुपेश हळर्णकर यांनी केली.
युवक कॉंग्रेस उत्तर गोवा समितीच्या अध्यक्षपदी जितेश कामत यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. हळर्णकर म्हणाले की, गोवा राज्यातील डळमळीत राज्यकारभार पाहता इथे कामत, लवंदे, कामत कंपनीशिवाय पर्यायच राहिला नाही की काय, असा संशय येतो आहे. देशात ज्या प्रकारे गांधी, गांधी, आणि गांधी नामाचा जप सुरू आहे तसेच गोव्यात कामत, लवंदे, कामत... या शिवाय कॉंग्रेसला काहीच दिसत नाही. सगळीकडेच कामत, लवंदे, कामत यांची दादागिरी दिसून येते, असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री बनल्यापासून कामत यांची जी घुसमट सुरू आहे ती अजूनही तशीच कायम आहे. अनेकदा त्यांचे आसन डळमळीत करण्याचा प्रयत्न त्यांच्याच सहकाऱ्यांकडून झाला. राज्यात महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, बलात्कार, खून, दरोड्यांचे प्रकार वाढतच आहेत पण कामत यांना त्याचे काहीच पडून गेलेले नाही. ते फक्त आपली खुर्चीच सांभाळण्यातच व्यस्त असतात, असे ते म्हणाले.
आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील काही नेत्यांना खाण व्यवसायाची चटक लावली आहे. कामत यांच्या कृपाशीर्वादानेच राज्यात "मधू कोडां' ची संख्या वाढत चालली आहे. सरकारातील मंत्र्यांनी आपलेच सगे- सोयरे व इष्ट आप्तेष्टांच्या नावावर खाणींना बेलाशक परवाने देण्याचा सपाटा लावला आहे. कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी चित्रपटांच्या नावावर टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांवर आधारित ""माय नेम इज "खाण' '' असा चित्रपट काढण्याचा सल्ला रुपेश हळर्णकर यांनी दिला आहे.
राज्यातील बेकायदेशीर खाण उद्योगांच्या विरोधात वेळोवेळी स्थानिकांनी आवाज उठविला. परंतु, त्यांची कामत यांनी कधीच पर्वा केली नाही, याची दखल म्हणून गोवा सरकार जोपर्यंत खाण धोरण तयार करत नाही तोपर्यंत गोव्यातील खाणींना पर्यावरणीय परवाना दिला जाणार नाही, असे केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील महागाईच्या तीव्र झळांमुळे आम आदमीची होरपळ होत असताना महागाई आटोक्यात आणण्यात कामत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हणून या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून दिगंबर कामत यांनी राजीनामा द्यावा व गोव्यात आम आदमींना कामत, लवंदे व कामत कंपनीकडून मुक्त करावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रुपेश हळर्णकर यांनी केले आहे.

No comments: