म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी): काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पर्वरी येथे पेट्रोलपंपच्या ठिकाणी बस आणि दुचाकीत झालेल्या अपघातात हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात (आयएचएम) शिक्षण घेणाऱ्या मुंबई येथील दोन तरुणी जागीच ठार झाल्यात तर, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तन्वी संतोष साळकर (२१) व हेतल ललित ठक्कर (२१) या मूळ मुंबई येथील तरुणींचे निधन झाले. तर, जखमी प्रकाश झिंटा (२२) याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज सायंकाळी दोन्ही मृतदेह शवचिकित्सेनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताला कारणीभूत ठरलेला बसचालक पोलिकुरपो फर्नांडिस (५४) याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्वरी येथील व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रात्रीअपरात्री फिरण्याचा प्रकार ऐरणीवर आला आहे. बाहेरील राज्यातून आलेला विद्यार्थिवर्ग मोठ्या संख्येने पर्वरी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. यातील काही तरुण तरुणींचा गट रात्री अपरात्री भरधाव वेगाने दुचाक्या घेऊन फिरत असल्याच्या अनेक तक्रारी पर्वरी पोलिस स्थानकात येतात. या प्रकारावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने अंकुश आणण्याची मागणी पोलिसांतर्फे केली जात आहे.
अधिक माहितीनुसार तन्वी आणि हेतल या दोघी पर्वरी येथे "आयएचएम'मध्ये शिक्षण घेत होत्या व पीडीए कॉलनीत पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. काल रात्री त्या प्रकाश याच्याबरोबर पार्टीला गेल्या होती, अशी माहिती मिळाली आहे. रात्री सुमारे १ च्या दरम्यान प्रकाश झिंटा एमएच ०१ एके ४६८५ या दुचाकीवरून दोघींना सोडण्यासाठी पीडीए कॉलनीत जात होता. यावेळी पेट्रोलपंपच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना म्हापशाहून पणजीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या जीए ०१ टी ४२८५ या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. याची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना इस्पितळात हालवले. मात्र दोघी तरुण मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी सदर बस ताब्यात घेतली असून बसच्या चालकालाही अटक केली आहे. याविषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सगुण सावंत करीत आहेत.
Wednesday, 24 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment