Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 25 February 2010

मास्टरचा द्विशतकी ब्लास्ट

ग्वाल्हेर, दि. २४ : जागतिक क्रिकेट आणि विक्रम यामधील दुवा असलेल्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वोच्च धावसंख्येचे आणखी एक क्षितिज निर्माण केले. क्रिकेटच्या देवतेने आज ग्वाल्हेरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावांची बरसात करत देशातील क्रीडाशौकिनांना चिंब भिजवतानाच पाकिस्तानच्या सईद अन्वरचा आणि झिंबाब्वेच्या चार्ल्स कॉंवेंट्रीचा १९४ धावांचा विक्रम लीलया मागे टाकला. एकदिवसीय सामन्यातील अस्पर्श्य असणारा दोनशे धावांचा टप्पा क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सचिनने गाठला. डॉन ब्रॅडमन यांचा आदर्श आयुष्यभर डोळ्यापुढे ठेवणाऱ्या सचिनने १४७ चेंडूत २५ खणखणीत चौकार आणि तीन उत्तुंग षटकाराच्या हा टप्पा पार केला. तत्पूर्वी सचिनने आपले ४६ वे शतक ९० चेंडूत १४ चौकारांच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. त्यानंतरच्या शंभर धावा त्याने ५७ चेंडूत काढल्या.
गेली २० वर्षे निरंतर साथ देणाऱ्या तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांना हे शतक अर्पण करत असल्याचे भावोद्गार देशवासीयांचा चाहता असलेल्या सचिन तेंडुलकरने काढले. सचिनच्या या अनोख्या कामगिरीची दखल घेत ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुपसिंग स्टेडियमच्या एका स्टॅंडला सचिनचे नाव देण्याचा निर्णय या सामन्यानंतर घेण्यात आला.

एकदिवसीय सामन्यातील
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

सचिन तेंडुलकर (२००)
चार्ल्स कॉंवेंट्री (१९४)
सईद अन्वर (१९४)
व्हीव्ह रिचडर्‌स (१८९)
सनथ जयसूर्या (१८९)
गॅरी कर्स्टन (१८८)
सचिन तेंडुलकर (१८६)
एम. एस. धोनी (१८३)
सौरव गांगुली (१८३)
मॅथ्यू हेडन (१८१)

No comments: