म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी): राज्यातील अंमलीपदार्थांच्या व्यवहारावर अंकुश घालण्याचा विडाच जणू पोलिसांनी उचलला असून आज हणजूण व कोलवाळ भागातून म्हापसा व हणजूण पोलिसांनी सुमारे साडेचार लाख किमतीचे अंमलीपदार्थ जप्त केले. वागातोर येथून दोघा काश्मिरी युवकांकडून सुमारे १.२० लाखांचा तर कोलवाळ येथून एका नेपाळी महिलेकडून ३.५० लाखांचा चरस पोलिसांनी हस्तगत केला.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी वागातोर येथील हॉटेल हिलटॉपजवळ शंकर दास (२५) व मुश्ताक अहमद जब्बर (२२) हे जम्मू येथील युवक संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे १.२ किलो चरस सापडला. याची किंमत स्थानिक बाजारात सुमारे १.२० लाख रुपये होते. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी एक महिला अंमलीपदार्थांसह गोव्याच्या दिशेने येत असून ती कोलवाळ परिसरात उतरणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक सॅमी तावारीस व निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने सदर महिलेला बिनानी बसथांब्यावर संशयास्पदरीत्या फिरत असताना ताब्यात घेतले. जयमाया बुडा (४०) असे या नेपाळी महिलेचे नाव असून तिच्याजवळ सुमारे ३.२ किलो चरस सापडले आहे. तिच्याजवळ असलेल्या बॅगेत सुमारे ६० पिशव्यांमध्ये या अंमलीपदार्थांचा साठा ठेवण्यात आला होता. सदर महिलेला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा चरस जप्त केला आहे.
Friday, 26 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment