फोंडा, दि. १५ (प्रतिनिधी): कुंकळ्ये येथील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी आज (दि. १५) सकाळी फोंडा पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन बालिकेच्या विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
दरम्यान, या बालिकेच्या विनयभंग प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ बालिकेच्या कुटुंबीयांवर काहीजणांकडून दबाव आणण्यात येत आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी सोमवार १४ फेब्रुवारी रोजी रात्री काहींनी त्यांच्या घरावर दगडफेक करून मोडतोड केली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. यासंबंधी फोंडा पालिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी एक निवेदन पोलिस अधिकार्यांना सादर केले आहे. या मोर्चामध्ये महिला संघटनेच्या श्रीमती आवडा व्हिएगस, कुंकळ्येचे पंचसदस्य नीलेश कुंकळ्येकर, माजी पंच सदस्य सौ. गामिनी कुंकळ्येकर व इतरांनी सहभाग घेतला.
गेल्या १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तीनच्या सुमारास कृष्णनाथ दत्तू नाईक (५५ वर्षे) याने एका बालिकेला फूस लावून आपल्या घरात नेऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कृष्णनाथ नाईक याला अटक करून त्याला ४ दिवसांचा पोलिस कोठडी मिळवली आहे. संशयिताची येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
संशयिताच्या विरोधात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याने एका युवतीचा विनयभंग करण्याचा यापूर्वी प्रयत्न केला होता. केवळ लोकलज्जेमुळे या प्रकाराची तक्रार करण्यात आली नव्हती, असे नीलेश कुंकळ्येकर यांनी सांगितले. संशयिताच्या विरोधात महिलांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका करू नये व कडक शासन करावे, अशी मागणी श्री. आवडा व्हिएगस यांनी यावेळी केली. विनयभंग प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाणार; ‘त्या’ पीडित बालिकेच्या कुटुंबाला गावाचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे गामिनी कुंकळ्येकर यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment