• मतदान १३ मार्च रोजी
* उमेदवारी अर्ज आजपासून स्वीकारणार
* मतदानाच्याच दिवशी मतमोजणी
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना आज दि. १३ रोजी जाहीर करण्यात आली. गोवा राज्य मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सर (आयएएस निवृत्त) यांनी आज जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पणजी महापालिकेच्या सर्व म्हणजे तीसही प्रभागांची निवडणूक १३ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज उद्या दि. १४ फेब्रुवारीपासून पणजी येथील निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत स्वीकारण्यात येतील.
दि. २१ फेब्रुवारी ही उमेदवारी स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. रविवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी होईल. दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अंतिम उमेदवारांची यादी व उमेदवारांची निवडणूक चिन्हे शनिवार दि. २६ रोजी जाहीर करण्यात येतील. मतदान दि. १३ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत होणार आहे. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि सुरळीत पार पडल्यास मतदानाच्याच दिवशी म्हणजे दि. १३ रोजी रात्री ८ वाजल्यापासून फार्मसी कॉलेज, पणजी येथे मतमोजणी होईल व एका तासात निकाल जाहीर करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज भरताना राखीव जागेतील उमेदवारांना रु. १,००० व खुल्या जागेतील उमेदवारांना रु. २,००० अनामत रक्कम भरावी लागेल. प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी फक्त ७५,००० रुपये खर्च करण्याची मुभा आहे, असे डॉ. मुदस्सर यांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘पणजी फर्स्ट’च्या उर्वरित उमेदवारांची नावे उद्या जाहीर
माजी महापौर अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली पणजी महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या ‘पणजी फर्स्ट’ या पॅनलचे उर्वरित पाच उमेदवार मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
स्वच्छ व पारदर्शी प्रशासनासाठी ‘पणजी फर्स्ट’ असा नारा देत माजी महापौर श्री. नाईक यांच्या नेतृत्वाखाली व भाजपच्या पाठिंब्याने पणजी महापालिकेच्या १३ मार्च रोजी होणार्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनलने ३० पैकी २५ प्रभागांतील उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जोरदार प्रचार चालवला आहे, अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली.
प्रभाग १८, २०, २१, २६ व ३० मधील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. याबाबत श्री. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील पाचही प्रभागांतील उमेदवार दि. १५ रोजी जाहीर करण्यात येतील अशी माहिती दिली.
Monday, 14 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment