अशोक नाईक यांनी अर्ज भरला
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीसाठी बाबूश मोन्सेरात यांच्या संपूर्ण पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे समर्थन लाभलेल्या या पॅनलचे नेते माजी महापौर अशोक नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
आज महापालिकेसाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात ‘पणजी फर्स्ट’चे नॅटी पो, नेल्सन फ्रान्सिस्को काब्राल, ग्लोरीया पो व अशोक नाईक यांचा समावेश आहे. विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व नगरसेविका रूथ फुर्तादो यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त प्रसाद वासुदेव सुर्लकर व ऑस्कर डिकुन्हा यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांत समावेश आहे.
‘पणजी फर्स्ट’चे पाच उमेदवार जाहीर
भाजपचा पाठिंबा लाभलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उर्वरित पाच उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली. प्रभाग क्रमांक-१८ः रत्नाकर शंभू फातर्पेकर, प्रभाग क्रमांक-२०ः सूरज कांदे, प्रभाग क्रमांक-२१ः महेश्वर महाबळेश्वर चेंडेकर, प्रभाग क्रमांक-२९ः प्रतिमा होबळे व प्रभाग क्रमांक-३०ः रूपेश हळर्णकर यांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक -२६ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे ऑस्कर डिकुन्हा यांना पाठिंबा देण्याची घोषणाही ‘पणजी फर्स्ट’ पॅनलने केली आहे.
‘जाळपोळ, मारबडव व हल्ले हेच काय ते कर्तृत्व’
बाबूश मोन्सेरात यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर केलेल्या टीकेसंबंधी आज काही पत्रकारांनी पर्रीकर यांना छेडले असता पर्रीकर यांनीही मोन्सेरात यांचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे व त्यामुळे पणजीत कुणीही निवडणूक लढवली तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही, असे ते म्हणाले. दोनापावला येथील आयटी हॅबिटेट प्रकल्पाची जाळपोळ, युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरील प्राणघातक हल्ला व परिसीमा म्हणून की काय तर पणजी पोलिस स्थानकावरील हल्ला व जाळपोळ आदी प्रकरणांचे नेतृत्व करणार्यांनी विकासाच्या बाता मारणे कितपत योग्य आहे, असा सवालच पर्रीकर यांनी केला. कुणीही वायफळ बडबड करीत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची आपली अजिबात इच्छा नाही. पणजी शहराचे भवितव्य अबाधित राहावे व पणजी महापालिकेला स्वच्छ प्रशासन मिळावे यासाठी ‘पणजी फर्स्ट’च्या पॅनलात स्वच्छ व प्रामाणिक उमेदवार दिले आहेत. पणजीतील जनता भूलथापांना अजिबात थारा देणार नाही व केवळ शब्दांचे बुडबुडे सोडून जनतेचा बुद्धिभेद करणार्यांचे डाव हाणून पाडण्याची कुवत पणजीवासीयांत आहे. याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीतून दिसून येईल, असेही ते म्हणाले. ‘पणजी फर्स्ट’च्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पणजीवासीय भ्रष्ट कारभाराला मूठमाती देतील, असा विश्वासही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.
Wednesday, 16 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment