‘जेएनएनयूआरएम’ योजना अपयशावरून
माजी महापौर अशोक नाईक यांचा ठपका
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे राबवण्यात येणार्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्निर्माण योजनेचा लाभ उठवण्यात पणजी महापालिकेला पूर्णपणे अपयश आले आहे. ताळगावचे आमदार तथा स्वतः राज्य सरकारात मंत्री असून बाबूश यांनाही या बाबतीत काहीही करता आले नाही, यावरूनच त्यांच्या पॅनलकडे पुन्हा सत्तेची सूत्रे बहाल करण्याची घोडचूक पणजीवासीय अजिबात करणार नाहीत, असा विश्वास माजी महापौर अशोक नाईक यांनी व्यक्त केला आहे.
देशभरातील प्रमुख शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणार्या या लोकप्रिय योजनेचा गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने बट्ट्याबोळच केला आहे. या योजनेअंतर्गत गोव्यातील पणजी शहराची निवड झाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास आता पाच वर्षे लोटली. परंतु, केवळ खाबूगिरीतच गुंतलेल्या पणजी महापालिकेच्या विद्यमान सत्ताधारी मंडळाला या योजनेचा विसर पडला, असा टोलाही श्री. नाईक यांनी हाणला. पणजीत पार्किंग, कचरा तसेच इतर पायाभूत सुविधांत सुधारणा घडवून आणण्यात ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली असती. ही योजना राज्य सरकारच्या नगरविकास खात्यातर्फे राबवण्यात येते. गोवा राज्य शहर विकास प्राधिकरण (सुडा) ही यासाठी नोडल एजन्सी आहे. बाबूश यांना पणजी शहराचा खरोखरच विकास करावयाचा असता तर त्यांनी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांचा पिच्छा पुरवून ही योजना मार्गी लावली असती, असेही श्री. नाईक म्हणाले. विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळेच या योजनेसाठी महापालिकेतर्फे शहराचा २०३० सालापर्यंतचा विकास आराखडा २००७ साली तयार करण्यात आला. परंतु, या अहवालाला चालना मिळवून देण्यासही सत्ताधारी मंडळ साफ अपयशी ठरले. २००८ साली नोडल एजन्सीकडे सुपूर्द केलेल्या या अहवालावर २१ जानेवारी २००९ रोजी राज्यस्तरीय सुकाणू समितीत चर्चा झाली व हा अहवाल केंद्रीय मंत्रालयाकडे अजूनही खितपत पडला आहे. पणजी शहरात जेवढी काही विकासकामे झाली ती केवळ पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळेच, असेही ते म्हणाले.
बाबूश मोन्सेरात यांचे आपल्या सत्ताधारी मंडळावर कोणतेही नियंत्रण नव्हते. केवळ पणजी शहराचे लचके तोडून लुटालूट करण्याचे सत्रच सत्ताधारी मंडळातील काही नगरसेवकांनी आरंभले. आता निवडणुका नजरेसमोर ठेवून या गटाकडून पणजीच्या विकासाच्या बाता मारल्या जात आहेत; या भूलथापांना पणजीवासीय अजिबात बळी पडणार नाहीत व या लोकांना योग्य तो धडा शिकवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ताळगावात केवळ आपल्या बंगल्याजवळील भागाचा विकास करून संपूर्ण ताळगावचाच कायापालट केल्याचा जो आभास निर्माण केला जात आहे तो फसवा आहे. ‘जेएनएनयुआरएम’ या योजनेव्दारे पणजीसह शेजारील ताळगाव व सांताक्रुझ मतदारसंघातील काही भागांचाही विकास करणे शक्य होते. परंतु, तेवढी धमकच या नेत्यांत नाही. केवळ पैशांच्या जोरावर लोकांना विकत घेऊन सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होण्याची स्वप्ने पणजी, ताळगाव व सांताक्रुझमधील जनता धुळीस मिळवील व खर्या अर्थाने लोकशाहीची बूज राखील, असा विश्वासही श्री. नाईक यांनी यावेळी बोलून दाखवला.
Sunday, 13 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment