पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): पोलिस, ड्रग माफिया व राजकारणी साटेलोटे प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यासंबंधी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या मंत्रालयाकडून ‘सीबीआय’ला कळविण्यात येईल. राज्य सरकार थेट ‘सीबीआय’कडे हे प्रकरण दाखल करू शकत नाही, अशी सारवासारव आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ड्रग्ज प्रकरणी राज्य सरकारकडून कोणताही पत्र व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आल्याने सरकार तोंडघशीच पडले होते. आज एका पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील भाष्य केले. मुख्य सचिवांनी केलेल्या पत्राची प्रत गृहमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत सादर केली होती, असेही ते म्हणाले. ‘सीबीआय’ ही केंद्रीय कार्मिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असल्याने त्यासाठी योग्य ती प्रक्रिया करावी लागते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेस सरकारकडून ‘इफ्फी’ घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ‘सीबीआय’ चौकशीवेळी या प्रक्रियेबाबत कोणताच प्रश्न उपस्थित झाला नव्हता व आत्ताच सरकार प्रक्रियेचे कारण पुढे करीत असल्याने हा चालढकलपणाचा प्रकार तर नव्हे, असा संशय बळावत चालला आहे. ‘सीबीआय’ने केलेल्या खुलाशावरून सरकारचे बिंगच फुटल्याची टीका करून सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment