२१ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
दुधाचे नवे दर
जादा फॅट दूध ः ३७ रु.
स्टॅन्डर्डाईझ्ड दूध ः ३३ रु.
टोनड् दूध ः २६ रु.
फोंडा, दि. १७ (प्रतिनिधी)
कुर्टी - फोंडा येथील गोवा राज्य दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या आज (दि. १७) सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत गोवा डेअरीच्या हाय फॅट आणि स्टॅन्डर्डाईझ्ड दुधाच्या विक्री दरात ३ रुपये आणि टोनड् दुधाच्या विक्री दरात २ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या दरवाढीची अंमलबजावणी येत्या २१ फेब्रुवारी २०११ पासून केली जाणार आहे. तर गोव्यातील स्थानिक दूध उत्पादक शेतकर्यांना दूध दरवाढ देण्याबाबत येत्या एप्रिल महिन्यात विचार विनिमय केला जाणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी एका पत्रकार परिषदेत येथे दिली.
महाराष्ट्र शासनाने दुधाच्या दरात वाढ केल्याने गोव्यातही नाइलाजाने दूध दरवाढ करावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी परिस्थिती ओळखून गोवा डेअरीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोव्यातील ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार दूध उपलब्ध करून देण्यास संघाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी गोवा डेअरीचे कार्यकारी संचालक सदानंद कुलकर्णी उपस्थित होते.
येत्या २१ फेब्रुवारीपासून जादा ङ्गॅट दुधाचा दर ३४ रुपये प्रतिलीटर वरून ३७ रुपये प्रतिलीटर आणि स्टॅन्डर्डाईझ्ड दुधाचा ३० रुपये प्रतिलीटर वरून ३३ रुपये प्रतिलीटर आणि टोनड् दुधाचा दर २४ रुपये प्रतिलीटर वरून २६ रुपये प्रतिलीटर असा होणार आहे. तसेच गोवा डेअरीच्या श्रीखंड व इतर उत्पादनात साधारण पाच ते दहा टक्के दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे, असेही श्री. सहकारी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात गेल्या १ फेब्रुवारी २०११पासून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गोवा डेअरीला सुमारे पन्नास टक्के दूध महाराष्ट्रातून आणून त्याची विक्री करावी लागत आहे. महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याने जादा दराने दुधाची खरेदी करावी लागत आहे. ह्यामुळे १ फेब्रुवारीपासून गोवा डेअरीला दिवसा लीटरमागे साधारण २.४० पैसे नुकसान सहन करावे लागत आहे. गोवा डेअरीला सरकारकडून मदत मिळत नाही. त्यामुळे जास्त नुकसान सहन करणे शक्य होणार नसल्याने दरवाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. गोवा डेअरीच्या कामगारांना सहावा वेतन आयोग लागू केल्याने जादा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तसेच इंधनाच्या किमतीतही वाढ झालेली आहे, असेही श्री. सहकारी यांनी सांगितले.
यापूर्वी दुधाच्या दरात वाढ करताना स्थानिक शेतकर्यांनाही दूध दरवाढ देण्यात आली होती. यावेळी मात्र सध्या स्थानिक शेतकर्यांना दूध दरवाढ दिलेली नाही. येत्या एप्रिल महिन्यात गोव्यातील दूध उत्पादकांना दूध दरवाढ देण्यावर प्राधान्य क्रमाने विचार केला जाईल, असेही श्री. सहकारी यांनी सांगितले.
गोव्यात सध्या दिवसा ४३ हजार लीटर दुधाचे संकलन केले जाते. महाराष्ट्रातून साधारण दिवसा ३५ हजार हजार दूध आणावे लागते. गोव्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी गोवा डेअरीकडून प्रयत्न केले जात आहेत. कामधेनू योजना राबविण्यासाठी गोवा डेअरीने पुढाकार घेऊन जनावरे खरेदीसाठी शेतकर्यांना आर्थिक साहाय्य केले आहे. वार्षिक पाच हजार लीटर दुधाचे उत्पादन वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून येत्या पाच वर्षात सुमारे पंचवीस हजार लीटर दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही श्री. सहकारी यांनी सांगितले.
Friday, 18 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment