पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): गोवा फलोत्पादन विकास महामंडळाला बेळगावात भाजी खरेदी करण्यावरून मज्जाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसने आक्रमक होत बेळगावातून गोव्यात भाजी घेऊन येणारी वाहने चेकनाक्यांवर अडवण्याचा निर्णय घेतला आहे. फलोत्पादन महामंडळाला भाजी न पुरवता ती अन्य व्यापार्यांमार्फत गोव्यात आणून त्याची विक्री करू पाहणार्यांना चांगलीच अद्दल घडवू, अशी घोषणाच युवक कॉंग्रेसने केल्याने हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
आज इथे कॉंग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन भांडारी यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस उपेंद्र राठवळ व इतर पदाधिकारी हजर होते. जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ झाल्याने राज्यातील सर्वसामान्य लोकांना कमी दरांत या वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फलोत्पादन महामंडळाकडून स्वस्त दरात भाजी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे बेळगावातून भाजी विकत घेऊन ती अव्वाच्या सव्वा दरात लोकांना विकून आपली तुंबडी भरू पाहणार्या काही व्यापार्यांनी हा डाव आखल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या व्यवसायात भाजी माफियांनी घुसखोरी केली असून त्यांनीच संगनमताने या योजनेला खीळ घालण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे व त्यामुळे या प्रकाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी युवक कॉंग्रेसने पुढाकार घेतल्याचे यावेळी श्री. भांडारी म्हणाले.
फलोत्पादनची विक्री केंद्रे ओसाड
स्वस्त भाजी उपलब्ध करून देणारी गोवा फलोत्पादन महामंडळाची विक्री केंद्रे आज भाजी पुरवठा न झाल्याने ओसाड पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राज्यातील विविध भाजी विक्री केंद्रांवर लोकांची झुंबड उडत होती पण आज भाजी नसल्याने या लोकांना हात हलवत परतावे लागले. बेळगावात फलोत्पादन महामंडळाची भाजी अडवून ती कुजवण्याचा प्रकार घडल्याने सर्वसामान्य लोकांकडूनही या कृतीचा निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी राज्य सरकारनेच हस्तक्षेप करून तोडगा काढला तर हा विषय निश्चितच सुटू शकेल, असे मत काही विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. या विषयावरून हिंसात्मक मार्गाचा अवलंब झाल्यास गोवा व कर्नाटकचे संबंध अधिक ताणू शकतात व त्यामुळे भविष्यात अधिक पेचप्रसंग निर्माण होण्याची भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे.
Thursday, 10 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment