म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी)
म्हापसा नगरपालिका मंडळाने पहिले सभापती व आमदार कै. रघुनाथ (बाप्पा) अनंत टोपले, कार्म द म्युनिसिपल बार्देशचे पहिले नगराध्यक्ष डॉ.. आंतोनियो पिंटो, मराठी अकादमीचे अध्यक्ष व मराठी साहित्यिक कै. शशिकांत नार्वेकर यांच्या स्मरणार्थ म्हापशातील विविध रस्त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. मुख्याधिकारी सौ. मधुरा नाईक यांच्या प्रयत्नामुळे आज (दि.६) हा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, उपनगराध्यक्ष सौ. विजेता नाईक, नगरसेवक व माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, नगरसेवक दीपक म्हाडेश्वर, सौ. रुही पत्रे, मुख्य अभियंता विष्णू नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हापसा बाजारपेठेतील शकुंतला पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन आज नगराध्यक्ष कांदोळकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आंध्र बँक ते पानकर यांच्यासमोरील रस्त्याला रे. डॉ. आंतोनियो पिंटो दी रोझारियो मार्ग असे नामकरण त्यांचे पुत्र डॉ. सिडनी यांनी फीत कापून केले. त्यानंतर डिशटीकार घर ते जनता हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे रघुनाथ टोपले मार्ग असे नामकरण त्यांच्या पत्नी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या सरोज टोपले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर म्हापसा अर्बन बँक ते मरड रस्त्याला कै. शशिकांत नार्वेकर मार्ग असे नामकरण त्यांचे बंधू चंद्रकांत नार्वेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
सन २००० मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पालिका मंडळाने नामकरणाचे ठराव संमत केले होते. पण त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर याबाबत कोणीच पुढाकार घेतला नाही. मागील काही महिन्यात सौ. नाईक यांनी मुख्याधिकारी पदाचा ताबा घेतल्यानंतर जनता हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने नामकरणाची मागणी केली होती.
Tuesday, 8 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment