डी. डी. कोसंबी विचार महोत्सव
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): सामाजिक एकता प्राप्त करण्यासाठी डी. डी. कोसंबी यांचे विचारधन प्रत्यक्षात आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे. भारताला अद्याप सामाजिक एकता राखण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत व त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा घडवून आधुनिक परंपरेचा अवलंब करण्यातच देशाचे हित आहे, असे प्रतिपादन भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ तथा कामगार चळवळीचे नेते लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी केले. डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात आज लॉर्ड मेघनाथ यांनी‘ कोसंबी- आधुनिक आणि सामाजिक समरसतेचा प्रश्न’ या विषयावर महोत्सवातील चौथे पुष्प गुंफले.
लॉर्ड मेघनाथ पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे झाली तरी अद्याप सामाजिक एकता प्राप्त करण्यात अपयश आले आहे. भारतीय प्रशासकीय कायद्यांतील नियम व अटींतच मुळी भ्रष्टाचाराचे मूळ आहे. इथे आपला हक्क मिळवण्यासाठी एखाद्या सरकारी यंत्रणेकडे अर्ज करताना संबंधितांना लाच द्यावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. कोसंबी यांनी आपल्या तत्त्वज्ञानातून स्वातंत्र्योत्तर भारताबाबत अनेक अपेक्षा बाळगल्या होत्या. एक समृद्ध व एकतेचे प्रतीक असलेला हा देश बनावा, अशी त्यांची धारणा होती. हा विचार प्रत्यक्षात उतरणे शक्य आहे व त्यासाठी देशातील युवा पिढीने हे आव्हान स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गीता ही मुळातच युद्धकथा आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर श्रीकृष्णाने पांडवपुत्र अर्जुनाला युद्धासाठी केलेले हे प्रबोधन आहे. डॉ. कोसंबी व डॉ. खेर यांनी मूळ गीतेचा शोध लावताना हा बौद्धधर्म व हिंदुत्वातील संघर्ष असल्याचे म्हटले आहे. आपली राजकीय रचनाच धर्म, जात संबंधांशी केंद्रित आहे व त्यामुळे सामाजिक विषमता हीच आपली संस्कृती बनली आहे. मंडल आयोगाने आरक्षणाची रचना जातीशी लावून सामाजिक विषमतेला खतपाणी घातले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आर्थिक निकषांची जोड लावण्यात आली. या आरक्षण रचनेत केवळ हिंदू धर्मातील जात, पंथ आदींचा विचार करण्यात आला. मुळात ख्रिस्ती, मुस्लीम या धर्मातही अनेक दुर्लक्षित घटक आहेत पण त्यांना या आरक्षणाचे साहाय्य होत नाही, ही गोष्ट अधिक खटकते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बाह्य आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भारताने शस्त्रनिमिर्ती, अण्वस्त्रनिमिर्तीवरच भर दिला पण सामाजिक विकासाकडे मात्र या देशाचे नेहमीच दुर्लक्ष झाले, अशी टिप्पणीही त्यांनी केली. अणुबॉब तयार केलेल्या या देशात अजूनही लोकांना चांगले रस्ते किंवा प्राथमिक सुविधाही पुरवण्यात आलेल्या नाहीत, असे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.
लॉर्ड मेघनाथ यांनी उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांवरही यावेळी समर्पक उत्तरे दिली. आर्थिक विकास ही नियमित प्रक्रिया आहे व त्यामुळे त्याचा राजकीय स्थितीशी संबंध लावणे योग्य ठरणार नाही. यावर्षी विविध भ्रष्टाचार प्रकरणांचा पर्दाफाश झाल्याने त्याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर जाणवेल हे मात्र नक्की, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. विविध भ्रष्टाचारांमुळे उद्योगपती व मीडियाला लक्ष्य बनवण्यात येत आहे पण प्रत्यक्षात याला कारणीभूत असलेल्या राजकीय व्यवस्थेविरोधात काहीच घडत नाही. भारतात समाजच भ्रष्ट असल्याने इथे भ्रष्टाचाराला रानच मोकळे मिळाले आहे, असा निष्कर्षही त्यांनी काढला.
गोव्यातील बेकायदा खाणींच्या विषयावर एका श्रोत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना भविष्यात बेकायदा खाण व्यवसाय हा राष्ट्रीय विकासाचा मुद्दा ठरणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असा जबर टोला हाणला. राजकीय जबाबदारीचे भान राजकीय नेत्यांना कसे काय प्राप्त होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. देशात रामायण किंवा महाभारताची जशी पारायणे होतात तशीच पारायणे समाजसुधारणांच्या विचारांची व्हायला हवीत. डी. डी. कोसंबी यांची विचारधारा प्रत्यक्षात येण्यासाठी जास्तीत जास्त या विचारांचे वाचन, लेखन व चर्चा घडण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. देशाच्या राजकीय अधोगतीबाबत त्यांना प्रश्न केला असता इथे कॉंग्रेस व भाजप हे राष्ट्रीय विचारधारेचा पुरस्कार करणारे पक्ष एकत्र आले तर त्यात नक्कीच बदल घडू शकतो, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. या दोन्ही पक्षांतील विचारधारेत फरक जरूर आहे पण राष्ट्रहिताबाबत त्यांच्यात काही प्रमाणात तरी समान विचारधारा असल्याने द्विपक्ष राजकीय व्यवस्थेचा भारताला उपयोग होऊ शकतो, असेही मत त्यांनी प्रकट केले.
Wednesday, 9 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment